खडकवासलाचे पाणी पेटले

खडकवासलाचे पाणी पेटले
Published on

पळसदेव, ता. १८ : खडकवासला कालव्याच्या उन्हाळी आवर्तनातील हक्काचे पाणी मिळावे, या मागणीसाठी इंदापूर तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यांनी सोमवारी पुणे-सोलापूर महामार्गावरील डाळज क्र. २ येथे रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. रणरणत्या उन्हातही तापलेल्या डांबरी रस्त्यावर बैठक मांडून जवळपास तासभर महामार्ग रोखून धरत आंदोलक शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली. यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
गेल्या अनेक दिवसांपासून इंदापूर तालुक्यातील शेतकरी खडकवासला कालव्याच्या उन्हाळी आवर्तनाची मागणी करत आहेत. मात्र, पाटबंधारे विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलक शेतकऱ्यांनी केला. “इंदापूरकरांच्या हक्काचे पाणी अधिकाऱ्यांकडून विकले जात आहे,” असा गंभीर आरोपही काही शेतकऱ्यांनी आंदोलनादरम्यान केला.
आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने शेतकरी जमा झाले होते. “कार्यकारी अभियंत्यांनी थेट आंदोलनस्थळी यावे आणि भूमिका स्पष्ट करावी,” अशी मागणी आंदोलकांनी लावून धरली. परिस्थिती तणावपूर्ण बनत असताना उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस व साहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद महांगडे यांनी मध्यस्थी करत आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक घेऊन पाणी प्रश्नावर तोडगा काढण्याचे नियोजन करण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. त्यानंतर आंदोलकांनी तात्पुरते आंदोलन मागे घेत महामार्ग मोकळा केला.

मोर्चा कृषिमंत्र्यांच्या निवास्थानाकडे वळला मात्र...
“शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असूनही शासन आणि कृषिमंत्री गंभीर नाहीत,” असा आरोप करत आंदोलकांनी कृषिमंत्र्यांच्या घरासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. यानंतर आंदोलकांचा मोर्चा कृषिमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या दिशेने वळला. तेथे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे यांनी मध्यस्थी करत आंदोलकांची समजूत काढली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.


इंदापूरच्या वाट्याचे पाणी जाणीवपूर्वक रोखले
पाण्याअभावी इंदापूर तालुक्यातील ऊस, डाळिंब, भाजीपाला तसेच अन्य पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. लाभधारक गावांमध्ये सध्या टँकरने पाणीपुरवठा होत असून, जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.“हक्काचे पाणी वेळेत मिळाले असते तर पिके वाचली असती,” अशी भावना अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली. पाटबंधारे विभागाने इंदापूरच्या वाट्याचे पाणी जाणीवपूर्वक रोखल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला.

आम्हाला कोणी वालीच नाही
इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण असून, “आमच्या प्रश्नांकडे पाहणारे कोणी उरले नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली. प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.


सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com