पावसाने झोडपले; बाजारभावाने तारले

पावसाने झोडपले; बाजारभावाने तारले

Published on

सचिन लोंढे ः सकाळ वृत्तसेवा
कळस, ता. ४ ः इंदापूर तालुक्यातील द्राक्ष हंगामावर यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा परिणाम झाला आहे. १५ एप्रिलनंतर छाटणी केलेल्या द्राक्ष बागांवर मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावासाचा मोठा दुष्परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. ऐन उन्हाळ्यात हजेरी लावलेल्या पावसाने दिवाळीपर्यंत मुक्काम केल्याने याचा थेट फटका द्राक्ष हंगामावर झाला आहे. पावसामुळे द्राक्ष बागांच्या गर्भधारणेवर परिणाम होऊन तालुक्यातील द्राक्षाच्या आगारातील उत्पादनात ३० ते ५० टक्क्यांपर्यंत घट झाल्याचे बोलले जात आहे. एकीकडे उत्पादनात घट झाली असली तरी, बाजारपेठेत द्राक्षाला मिळत असलेल्या चांगल्या दरामुळे शेतकऱ्यांना काहीसा आधार मिळाला आहे.
तालुक्यात सुमारे अडीच हजार एकर क्षेत्र द्राक्ष लागवडीखाली आहे. यामध्ये प्रामुख्याने शरद सिडलेस, नारायणगाव जम्बो, नानासाहेब पर्पल, मामासाहेब पर्पल, कृष्णा सीडलेस या काळ्या वाणाचा व माणिक चमन, एसएसएन, आरके, सोनाक्का, सुपर सोनाक्का, अनुष्का यांसारख्या पांढऱ्या वाणांचा समावेश आहे. द्राक्षाच्या जिवावर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील १०- १२ गावांमध्ये कोट्यवधींची उलाढाल होत असते. येथील द्राक्षांना परदेशात मोठी मागणी असून, नानासाहेब पर्पल, मामासाहेब पर्पल, शरद, नारायणगाव, क्रिमसन्स आणि किंग बेरी यांसारख्या वाणांची मोठ्या प्रमाणावर निर्यात होत असते. दर्जेदार उत्पादनामुळे या वाणांनी आंतरराष्ट्रीय बाजारात चांगली गोडी निर्माण केली आहे. निर्यातक्षम द्राक्षातून मिळणारे उत्पन्न हे शेतकऱ्यांसाठी ‘दुधावरची साय’ ठरत आहे.

द्राक्ष बागांना हवामानाचा दुहेरी फटका
मात्र, गेल्या दोन वर्षांपासून हवामान बदलाचा प्रतिकूल परिणाम द्राक्ष हंगामावर होत असल्याचा अनुभव येथील शेतकऱ्यांना आला आहे. वर्ष २०२३- २४मध्ये ज्याप्रमाणात द्राक्षाचे उत्पादन मिळाले, त्या प्रमाणात वर्ष २०२४- २५ व २०२५- २६ या हंगामात द्राक्ष उत्पादनात ५० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. गेल्यावर्षी १२ मे पासून सुरू झालेल्या पावसामुळे एप्रिलमध्ये छाटणी झालेल्या द्राक्ष बागांच्या गर्भधारणेवर विपरीत परिणाम झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे वेलींची पांढरी मुळी नीट तयार होऊ शकली नाही. ज्याचा थेट परिणाम आता उत्पादनावर दिसत आहे. हवामान बदलाचे संकट अद्यापही संपले नसल्याचा प्रत्यय या आठवड्यात शेतकऱ्यांना आला आहे. चार दिवसांपूर्वी हुडहुडी भरवणारी कडाक्याची थंडी अचानक गायब झाली असून, सध्या तीन- चार दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाले आहे. या ढगाळ वातावरणामुळे बागांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता गृहीत धरून, शेतकऱ्यांना महागड्या औषधांची फवारणी करावी लागत आहे.

आमच्याकडे नानासाहेब जंबो व माणिक चमन या दोन प्रकारच्या वाणाची अनुक्रमे एक व अर्धा अशी दीड एकर द्राक्ष बाग आहे. कोरोनापासून वर्ष २०२३- २४ पर्यंतचा हंगाम द्राक्षाच्या दराचा पडता काळ होता. मात्र, गतवर्षी द्राक्षाचे बाजार उसळले, मात्र उत्पादन निम्म्याने घटले आहे. ज्या बागेतून आठ टनांपर्यंत द्राक्ष माल मिळत होता, तेथे गतवर्षी चार टन उत्पादन मिळाले.
- बापूराव खारतोडे, द्राक्ष उत्पादक, कळस

हवामान बदलाचा मोठा फटका गेल्या दोन वर्षांपासून द्राक्ष उत्पादनावर होत आहे. यंदाही १५ एप्रिलनंतर छाटणी केलेल्या बागांवर ५० टक्क्यांपर्यंत मालाचे प्रमाण घटले आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी मार्च महिन्यात खरड छाटणी उरकली होती, त्यांच्या बागेत माल बऱ्यापैकी आहे. सध्या पांढऱ्या द्राक्षाला १२० रुपये प्रतिकिलोपर्यंत दर मिळत आहे. तर काळी द्राक्षे १५० रुपये प्रतिकिलोपर्यंत विकली जात आहे. यंदा द्राक्षाचे बाजार टिकून राहण्याची शक्यता आहे.
- अॅड. दयानंद सांगळे, द्राक्ष उत्पादक, बिरंगुडी

द्राक्षाचे दर (प्रति किलो)
पांढरी द्राक्षे - १२० रुपये
काळी द्राक्षे - १५० रुपयांपासून पुढे.
जंबो व एक्स्पोर्ट क्वालिटी - १५० ते २०० रुपये

द्राक्षाचे मागील तीन वर्षातील उत्पादन
द्राक्ष वाण - सन - उत्पादन (प्रतिएकर टनांत) - दर (प्रतिकिलो रुपयांमध्ये)
काळी द्राक्ष - सन २०२३-२४ - ८ - ७५ रुपये.
काळी द्राक्ष- सन २०२४-२५ - ४ - १३० रुपये.
काळी द्राक्ष - सन २०२५-२६ - २.५/४ - १३० ते २०० रुपयांपर्यंत.
पांढरी द्राक्ष - सन २०२३-२४ - ८ - २० रुपये.
पांढरी द्राक्ष- सन २०२४-२५ - ७ - ४७ रुपये.
पांढरी द्राक्ष- सन २०२५-२६ - ७ - १०० ते १२ रुपयांपर्यंत.

03276

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com