

इंदापूर, ता. १७ ः इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात सुरू असलेल्या १६ रुग्णालयांच्या नोंदणी अथवा नूतनीकरणाच्या प्रक्रियेबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर जिल्हा आरोग्य विभागाने गंभीर दखल घेतली आहे. संबंधित रुग्णालयांची नोंदणीची स्थिती, आवश्यक कागदपत्रे तसेच वैद्यकीय पात्रतेसह अन्य बाबींची चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी, पंचायत समिती इंदापूर यांना दिले आहेत.
चौकशीचा अहवाल सात दिवसांत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याबाबत सुधाकर तुकाराम बोराटे यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने ही कार्यवाही करण्यात आली आहे. तक्रारीमध्ये तालुक्यातील काही रुग्णालये आवश्यक नोंदणी किंवा नूतनीकरणाशिवाय सुरू असल्याचा आक्षेप घेण्यात आला होता. त्यामुळे संबंधित रुग्णालयांची नोंदणी वैध आहे का, त्यासाठी सादर केलेली कागदपत्रे योग्य आहेत का, तसेच नोंदणी अथवा नूतनीकरणाच्या वेळी आवश्यक पडताळणी करण्यात आली होती का, याची तपासणी केली जाणार आहे.
याप्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हंकारे यांनी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना संबंधित सर्व बाबींची चौकशी करून सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे या १६ रुग्णालयांच्या नोंदणी-नुतनीकरणाची वैधता, उपलब्ध शासकीय कागदपत्रे, संबंधित वैद्यकीय पात्रता आणि नोंदणी प्रक्रियेदरम्यान करण्यात आलेली पडताळणी याबाबत चौकशीत काय निष्पन्न होते, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
तक्रारीतील आरोपांची अद्याप चौकशी सुरू असून, त्यातून दोष अथवा अनियमितता सिद्ध झालेली नाही. यामुळे संबंधित रुग्णालयांची बाजू आणि चौकशीचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतरच या बाबींचे अंतिम स्वरूप स्पष्ट होणार आहे. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.