हर्षवर्धन पाटील म्हणतात "गेल्या पाच वर्षांत'

मनोहर चांदणे
रविवार, 4 ऑगस्ट 2019

निमगाव केतकी : विधानसभा निवडणूक जशी जवळ येऊ लागली आहे, तसा आरोप-प्रत्यारोपांना जोर येत आहे. पुणे जिल्ह्यात खरी उत्सुकता आहे ती इंदापूर मतदार संघात काय होणार? येथे कॉंग्रेस नेते व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान आमदार दत्तात्रेय भरणे दावेदार आहेत. आघाडीत ही जागा कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. या पार्श्‍वभूमीवर हर्षवर्धन पाटील आमदार भरणे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. ते आपल्या भाषणात "गेल्या पाच वर्षांत' असा उल्लेख करून भरणे यांच्यावर टीका करताना दिसत आहेत.

इंदापूर तालुक्‍याचा गेल्या पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात विकास खुंटला आहे. विकासकामांचा अनुशेष भरून काढावा लागणार आहे. यासाठी येणाऱ्या विधानसभेला आपल्याला साथ द्या, असे आवाहन हर्षवर्धन पाटील निमगाव केतकी येथील राऊतवाडी येथे केले आहे. शनिवारी ग्रामपंचायतीतर्फे राऊतवाडी व जाधववाडी येथील बंदिस्त गटार, अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण, 19 लाख रुपये किमतीच्या शाळेच्या संरक्षक भिंतीच्या कामाचे भूमिपूजन पाटील यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची शेटफळ हवेली ही पाणी योजना लवकरच सुरू होऊन निमगाव केतकीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न कायमचा सुटणार आहे. ही योजना कॉंग्रेसच्या माध्यमातून सुरू होत असून, यासाठी ग्रामपंचायतीने पाठपुरावा केला आहे. येथील अनेक प्रश्‍न आपल्या काळात मार्गी लागले असून, यापुढेही येथे विकास कामे मोठ्या प्रमाणात करू, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

धरणे शंभर टक्के भरली असताना देखील इंदापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. शेतकऱ्यांना चारही बाजूने घेरले आहे. तालुक्‍यातील जनतेचे हक्काचे पाणी पळविले आहे. 2014 पर्यंत तालुक्‍यातील नागरिकांना भरपूर पाणी मिळत होते. मात्र, गेल्या पाच वर्षांमध्ये तालुक्‍यातील पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. पाणी परत मिळविण्यासाठी लढा देण्याची गरज हर्षवर्धन पाटील यांनी लासुर्णे येथे व्यक्त केली.

गेल्या वर्षीही धरणे शंभर टक्के भरली होती. तरीही तालुक्‍यातील शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही. खडकवासल्याचे पाणी शेवटच्या टोकापर्यंत येत नाही. भाटघरचे पाणी तालुक्‍यातील टेलच्या शेतकऱ्यांना मिळत नाही. याचा वापर बारामती तालुक्‍यात जास्त प्रमाणात होतो. नीरा-देवधरच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. उजनीचे पाणी मराठवाड्याला नेण्याचा डाव सुरू आहे. तसेच उजनीतील पाण्याचे नियोजन नसल्यामुळे धरणातून बेसुमार पाणी सोडण्यात येते. इंदापूर तालुका टेलला असल्यामुळे शेटफळचा तलाव कोरडा राहिला. यावर्षीही अशीच परिस्थिती राहण्याची चिन्हे दिसत आहेत, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indapur Politics Between Patil & Bharne