इंदापुरात दुष्काळ आमदारामुळेच म्हणायचे बाकी : दत्तात्रेय भरणे

मनोहर चांदणे
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

विरोधी आमदार असतानाही इंदापूर तालुक्‍यात कोट्यवधी रुपयांचा निधी आणला. मोठ्या प्रमाणात विकास केला आहे. तालुक्‍यात पडलेला दुष्काळ हा निसर्गनिर्मित असताना तो आमदारामुळेच पडलाय एवढे म्हणायचे बाकी असल्याची टीका आमदार दत्तात्रेय भरणे यांनी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता केली.

निमगाव केतक (पुणे) : विरोधी आमदार असतानाही इंदापूर तालुक्‍यात कोट्यवधी रुपयांचा निधी आणला. मोठ्या प्रमाणात विकास केला आहे. तालुक्‍यात पडलेला दुष्काळ हा निसर्गनिर्मित असताना तो आमदारामुळेच पडलाय एवढे म्हणायचे बाकी असल्याची टीका आमदार दत्तात्रेय भरणे यांनी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता केली.

हर्षवर्धन पाटील गावभेटी दौऱ्यात भरणे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका करत आहेत. तर भरणे यांनी सध्या गावोगावी विविध कामांचे भूमिपूजन व उद्‌घाटन यावर भर देत तालुका पिंजून काढत आहेत. गुरुवारी गोतोंडी येथे दोन कोटी 55 लाख रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्‌घाटन भरणे यांच्या हस्ते झाले. बांधकाम सभापती प्रवीण माने अध्यक्षस्थानी होते.

प्रवीण माने यांनी येथील गौतमेश्‍वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी 15 ते 20 लाखाचा निधी देण्याची ग्वाही दिली. अप्पासाहेब जगदाळे यांनी तालुक्‍यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून भरीव विकास झाल्याचे सांगितले. सरपंच शोभना कांबळे म्हणाल्या, ""मागील चार साडेचार वर्षांत खासदार सुप्रिया सुळे, आमदार भरणे व बांधकाम सभापती माने यांच्या माध्यमातून सुमारे दहा कोटींचा निधी गावाला मिळाल्याने मोठा विकास झाला आहे, हे गावकरी कधी विसरणार नाहीत.'' अप्पा मारकड यांनी झालेल्या कामांची यादी वाचून दाखविली. सूत्रसंचालन प्रा. दिनेश पवार यांनी केले.

खोटारडेपणा कोण करतात, हे जनतेला माहीत आहे. जी माणसे खरोखरी काम, मदत व सहकार्य करतात त्यांनाच साथ द्या. तालुक्‍यात कोट्यवधी रुपयांची कामे सुरू आहेत. ती स्थानिकांनी दर्जेदार करून घ्यावीत.
दत्तात्रेय भरणे, आमदार, इंदापूर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indapur Politics Between Patil & Bharne