

इंदापूर, ता. २६ : बावडा (ता. इंदापूर) येथील पोल्ट्री फार्ममध्ये मीटरला रिमोट किट बसवून तब्बल १ लाख ९६ हजार युनिट विजेची चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महावितरणने २२ महिन्यांच्या या चोरीप्रकरणी दोघांविरुद्ध ३१ लाख रुपयांच्या वसुलीसाठी इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
महावितरणच्या कोल्हापूर येथील फिरत्या पथकाने १३ ऑगस्ट २०२६ रोजी बावडा येथील पोल्ट्री फार्मच्या वीजजोडणीची तपासणी केली. या कारवाईत ऑक्टोबर २०२४ ते जुलै २०२६ या २२ महिन्यांच्या कालावधीत झालेली मोठी वीजचोरी उघडकीस आली. पथकाला तपासणीदरम्यान वीजमीटरमध्ये छेडछाड केल्याचे आढळले होते.
याप्रकरणी ग्राहक प्रतिनिधी महावीर सुभाष घोगरे व रत्नाकांत सुभाष घोगरे यांना १ लाख ९६ हजार ७४४ युनिट विजेच्या वापरापोटी ३१ लाख २० हजार २२० रुपयांचे वीजबिल आणि ६६ हजार रुपयांची तडजोड रक्कम भरण्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, दिलेल्या मुदतीत संबंधित रक्कम न भरल्याने महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुरेश चनबसप्पा जोगी यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, दोघांविरुद्ध विद्युत कायद्यानुसार इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान पंचनामा, असेसमेंट शीट, वीजचोरीचे बिल व छायाचित्रांसह आवश्यक कागदपत्रे तयार करण्यात आली आहेत. वीजचोरीसाठी वापरलेले सुमारे २६ हजार रुपये किमतीचे रिमोट किट जप्त करून सीलबंद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
अशी केली जात होती चोरी
पोल्ट्री फार्मच्या रोहित्राजवळील मीटरशी छेडछाड केल्याच्या खुणा आढळल्या. मीटरचे पीव्हीसी सील आणि टर्मिनल कव्हरच्या क्लिप तुटलेल्या होत्या. मीटरच्या वरच्या बाजूला छिद्र पाडून आतमध्ये पीसीबीच्या खाली एक रिमोट कंट्रोल किट बसवले होते. या रिमोटच्या साहाय्याने मीटर वारंवार बंद-चालू करून विजेचा प्रत्यक्ष वापर कमी दाखवला जात होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.