इंदापूर-वरकूटे बुद्रुक रस्त्याची दुरावस्था

डॉ. संदेश शहा
Tuesday, 3 November 2020

येथील उजनी पाणलोट क्षेत्रात सापडणारे मासे विक्रीसाठी इंदापूर व भिगवण येथे याच रस्त्याने जावे लागते, तर इंदापूर या तालुक्याच्या ठिकाणी आपली कामे करून घेण्यासाठी अनेक शेतकरी व नागरिक या मार्गाचा वापर करतात. या मार्गावरील खड्डे चुकवताना अनेकांना नाकीनऊ येतात.

इंदापूर (पुणे) : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग वरकुटे पाटी ते कळाशी गंगावळण रस्त्याची दुरावस्था झाली असून या परिसरातील नागरिकांना वाहन चालवताना खड्डे चुकविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे रोज एखादी दुचाकी घसरून आयतेच अपघातास आमंत्रण मिळत आहे.

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गापासून वरकुटे बुद्रुक गावात रस्ता जातो तर वरकुटे येथून अगोती, कळाशी, गंगावळण या गावास हा रस्ता जातो. ही गावे ऊसाची आगार म्हणून ओळखली जात असून येथून बिजवडी येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना, वरकुटे बुद्रुक येथील सोनाई कृषी प्रक्रिया हा गूळ भुकटी कारखान्यास ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस जातो. 

येथील उजनी पाणलोट क्षेत्रात सापडणारे मासे विक्रीसाठी इंदापूर व भिगवण येथे याच रस्त्याने जावे लागते, तर इंदापूर या तालुक्याच्या ठिकाणी आपली कामे करून घेण्यासाठी अनेक शेतकरी व नागरिक या मार्गाचा वापर करतात. या मार्गावरील खड्डे चुकवताना अनेकांना नाकीनऊ येतात.

त्यातच अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणचे डांबर वाहून गेले असून खडी उखडली आहे. त्यामुळे रस्त्याची लेव्हल देखील गेली आहे. त्यामुळे दुचाकी व चार चाकी वाहनांचे देखील नुकसान होत आहे. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी संदेश देवकर, अशोक शिंदे, कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुभाष काळे, धनाजी गोळे यांनी केली आहे.

 
संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indapur Varakute Budruk road is in bad condition