दरे ते करंदी फाटा दरम्यान अनेक झाडांची कत्तल

दरे ते करंदी फाटा दरम्यान अनेक झाडांची कत्तल

Published on

इंदवलीनजीक रस्त्यालगतच्या
झाडांवर अज्ञाताकडून कुऱ्हाड

हुमगाव, ता. २६ ः जावळी तालुक्यातील हुमगावहून मेढ्याकडे जाणाऱ्या करंदी फाटा ते दरे मार्गावरील इंदवली गावाजवळ रस्त्याकडेची झाडे अज्ञाताने ताेडली आहेत. या प्रकाराची तातडीने दखल घेण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
चार वर्षांपूर्वी बांधकाम विभागाने दरे ते करंदीफाटा रस्त्याच्या दुतर्फा शेकडो देशी झाडांची लागवड केली होती. उन्हाळ्यातही ती झाडे टँकरद्वारे पाणी देऊन जगवण्यात आली होती. सध्या अनेक अशी झाडे डेरेदार झाली होती. त्यामुळे या रस्त्याच्या सौंदर्यात भर पडली. मात्र, गेल्या आठवड्यात करंदी ते इंदवली दरम्यानची आठ ते दहा डेरेदार झाडे जागेवरच कापून टाकली आहेत. अद्यापही या झाडांचे अवशेष त्याच ठिकाणी पडून आहेत. त्यामुळे ही झाडे कुणी व कशासाठी कापली? हे गुलदस्त्यात आहे. सध्या या मार्गाचे रुंदीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. या रुंदीकरणासाठी ही झाडे कुठेही अडथळा ठरत नसतानाही ती तोडली कुणी? याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. संबंधित विभागाने यासंदर्भात तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे.

A00293
इंदवली ः गावाजवळ रस्त्याच्या बाजूची तोडून पडलेली झाडे. (भाऊसाहेब जंगम ः सकाळ छायाचित्रसेवा)
................................................

Marathi News Esakal
www.esakal.com