Pune : रखडलेली शिक्षक भरती तात्काळ सुरू करण्याबाबत इच्छुक उमेदवारांचे बेमूदत उपोषण सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

teacher

रखडलेली शिक्षक भरती तात्काळ सुरू करण्याबाबत इच्छुक उमेदवारांचे बेमूदत उपोषण सुरू

पुणे : रखडलेली शिक्षक भरती तात्काळ सुरू करावी, १९६ संस्थांचे पसंतीक्रम देऊन याद्या जाहीर कराव्यात, फेब्रुवारी २०२२मध्ये आयोजित शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणीत भरण्यात येणारी शिक्षकांची रिक्त पदे जाहीर करावीत, अशा मागण्यांसाठी डी.टी.एड, बी.एड. स्टुडंट असोसिएशनच्या वतीने शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.

राज्यातील ५६१ व्यवस्थापनाच्या सुमारे दोन हजार ६२ रिक्त पदांसाठी सप्टेंबर २०२१ मध्ये मुलाखतीसह पद भरतीसाठी शिफारस करण्यात आली. त्यानंतर तब्बल दोन महिने उलटले तरी अद्याप संस्थेसाठी लॉगिन उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. तसेच भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची यादी पवित्र पोर्टलवर जाहीर करावी. तसेच विनामुलाखतीच्या रिक्त असलेल्या पदांची प्रवर्गनिहाय व विषयनिहाय माहिती उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच खासगी संस्थांची शिक्षक भरती पवित्र पोर्टल मार्फतच करावी, त्यात कुठलाही बदल करण्यात येऊ नये, अशी मागणी शिक्षक भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची आहे. शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या उमेदवारांतर्फे असोसिएशनच्या वतीने शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

‘‘२०१७मध्ये पवित्र पोर्टलमार्फत खासगी संस्थांच्या सर्व व्यवस्थापनावर भरती करण्यात आली. त्यामुळे संस्थेतील भरतीसंदर्भातील गैरप्रकाराला आळा बसला. अनेक गुणवंत उमेदवारांना कोणताही आर्थिक व्यवहार न करता शिक्षक भरतीची संधी मिळाली. अनेक संस्थाचालक पवित्र पोर्टलमार्फत भरती प्रक्रियेला विरोध करत आहेत. तरी शिक्षण विभागाने खासगी संस्थांमधील सध्याच्या शिक्षक भरती प्रकियेत बदल करू नये.’’

- संतोष मगर, संस्थापक अध्यक्ष, डी.टी.एड., बी.एड. स्टुडंट असोसिएशन

loading image
go to top