

लोणेरे, ता. २६ : ‘‘केवळ प्राचीन काळात आपला देश श्रीमंत होता, या वैभवावर समाधान न मानता, पेटंट आणि संशोधनाच्या जोरावर भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनवणे ही काळाची गरज आहे,’’ असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. आक्रमणांमुळे मागे पडलेला आपला देश आता तंत्रज्ञानातील प्रगतीमुळेच जागतिक स्तरावर पुन्हा अव्वल स्थान मिळवू शकतो, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र क्वांटम मिशनअंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातर्फे आयोजित किस्किट फॉल फेस्ट २०२६च्या उद्घाटनावेळी पाटील बोलत होते. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रजनीश कामत, प्र-कुलगुरू डॉ. विनोद मोहितकर, कुलसचिव डॉ. सचिन पोरे, ‘नॅसकॉम एआय’चे अमोल महामुनी, प्रा. अरविंद किवळेकर या वेळी उपस्थित होते. किस्किट फॉल फेस्टच्या आयोजनासाठी पहिल्यांदाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची निवड झाली आहे. यात १६५ विद्यार्थी, ३० शिक्षक सहभागी झाले आहेत. या अंतर्गत क्वांटम कम्प्युटिंगचे शिक्षण दिले जाणार आहे. मॅक्स प्लँक विद्यापीठ, आयबीएम, आयसर अशा नामाकित संस्थांतील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.
पाटील म्हणाले, ‘‘जगातील ९० टक्क्यांहून अधिक तंत्रज्ञान कंपन्यांचे प्रमुख भारतीय किंवा भारतीय वंशाचे आहेत. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारतीय उत्तम कामगिरी करतात हे जागतिक पातळीवर सिद्ध झाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या माध्यमातून क्वांटम तंत्रज्ञानाची माहिती महाविद्यालये, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे गरजेेचे आहे. आजवर विद्यापीठाबाबत मंत्रालयाकडून काही त्रुटी राहिल्या असतील; पण आता त्या दूर केल्या जातील.’’
डॉ. कामत म्हणाले, ‘‘काही वर्षांपूर्वी भारताने ‘हार्डवेअर’ची संधी गमावली. त्या वेळी चीन, तैवानसारखे देश पुढे निघून गेले. आता आलेली संधी गमावली जाऊ नये यासाठी झपाट्याने धोरणे बदलत आहेत. भविष्यवेधी तंत्रज्ञान, चीप, सॉफ्टवेअर याबाबत काम होत आहे.’’
५० हजारांपेक्षा अधिक जणांचा अभ्यास
अभियांत्रिकी क्षेत्रात सरकार, शिक्षण संस्था, संशोधन संस्था, उद्योग यांनी मिळून काम करण्याची गरज आहे. केंद्र सरकारच्या क्वांटम मिशनच्या धर्तीवर महाराष्ट्र क्वांटम मिशन जाहीर केले आहे. गेल्या शैक्षणिक वर्षात ५० हजार ४५ शिक्षक-विद्यार्थ्यांनी ‘क्वांटम’चे ऑनलाइन अभ्यासक्रम पूर्ण केले, अशी माहिती विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. विनोद मोहितकर यांनी दिली.
गेल्या काही वर्षांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील तक्रारींमुळे संलग्न महाविद्यालयांनी या विद्यापीठातून बाहेर पडून मूळ सार्वजनिक विद्यापीठाशी संलग्नतात मिळावी, अशी मागणी सुरू केली आहे. अशा महाविद्यालयांना त्या पद्धतीची सोय उपलब्ध करून देण्यात येईलच. त्यादृष्टीने पावले उचलण्यात येत आहेत. परंतु, तंत्रशास्त्र विद्यापीठात संशोधनाला आणि नवोन्मेषला प्राधान्य देण्यात येत आहे. तसेच हे कॅम्पस विद्यापीठ म्हणून, संशोधन केंद्र म्हणून विकसित करण्यात येईल.
- चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.