Corona Vaccination: पुणे जिल्ह्यात तीन ठिकाणी पार पडली कोरोनाची 'ड्राय रन'!

सम्राट कदम
Saturday, 2 January 2021

पुण्याचे माजी विभागीय आयुक्त आणि राज्य शासनाचे सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर यांनी रंगीत तालमीची पाहणी केली. 

पुणे : औंधच्या शासकीय जिल्हा रुग्णालयाबाहेर शनिवारी (ता.२) सकाळपासूनच माध्यमांच्या प्रतिनिधींनी गर्दी केली होती. रुग्णालयातील मुख्य इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर डॉक्‍टर, परिचारिकांसह वैद्यकीय अधिकाऱ्यांची लगबग जरा अधिकच जाणवत होती. निमित्त होते देशातील पहिल्या कोरोना लसीकरणाच्या रंगीत तालमीचे. यावेळी 25 कोविड योद्‌ध्यांचे ड्राय रण घेण्यात आले. 

- हे ही वाचा : दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी फॉर्म सतरा भरण्यासाठी २५ जानेवारीपर्यंत मुदत

केंद्र सरकारकडून देशभरात कोरोणाचे लसीकरण करण्यात येणार असून, शनिवारी पूर्वतयारी म्हणून देशभरात ड्राय रन (रंगीत तालीम) घेण्यात आली. त्याचाच भाग म्हणून मुळशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालय आणि पिंपरी चिंचवडे जिजामाता आरोग्य केंद्रात "ड्राय रन' घेण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नंदापुरकर यांच्या मार्गदर्शनानुसार निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष देशपांडे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे आणि डॉ. प्रकाश रोकडे यांच्या सहकार्याने ही रंगीत तालीम पार पडली. पुण्याचे माजी विभागीय आयुक्त आणि राज्य शासनाचे सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर यांनी रंगीत तालमीची पाहणी केली. 

महाराष्ट्राच्या पोरींनी इतिहास घडवला; राजपथावर परेडसाठी तिघींची निवड

रंगीत तालमीचे पाच टप्पे :
1) पहिला टप्पा : जिल्ह्यातील तीन ठिकाणांची रंगीत तालमीसाठी निवड करण्यात आली. प्रत्येक ठिकाणी 25 अशा प्रकारे एकूण 75 कोविड योद्‌ध्यांवर ड्राय रन घेण्यात आले. 

2) दुसरा टप्पा : लसीकरणाच्या ठिकाणी प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्षांची व्यवस्था करण्यात आली. लस टोचल्यानंतर अर्धा तास लाभार्थ्याला निरीक्षणामध्ये ठेवण्यात आले. जर त्याला काही त्रास झाला तर आवश्‍यक वैद्यकीय सुविधा तेथेच उपलब्ध करण्यात आली आहे. 

3) तिसरा टप्पा : लसीकरणासाठी पाच सदस्यांची निवड करण्यात आली आहे. ज्यात सुरक्षा रक्षक, कोविन पोर्टलवरील माहिती आणि ओळखपत्र तपासणारा अधिकारी, लस टोचणारे, लाभार्थ्यावर अर्धातास नजर ठेवणारे आणि गर्दीचे नियंत्रण करणारा अधिकारी. 

4) चौथा टप्पा : लाभार्थ्यांना कोवीन पोर्टलवर भरलेल्या माहितीच्या आधारे समक्ष पडताळून लसीकरणाला पाठविण्यात येईल. या पोर्टलमुळे लसीकरण सत्राची नोंद, ठिकाण, डोस आदींची सविस्तर माहिती मिळेल.

5) पाचवा टप्पा : लसिकरणानंतर होणाऱ्या विपरीत परिणामां करिता पूर्वतयारीदेखील यावेळी करण्यात आली. 

Govt Jobs : भारतीय तटरक्षक दलात ३५८ पदांची भरती; दहावी पास उमेदवारांनो करा अर्ज​

रंगीत तालमीचे वैशिष्ट्ये :
- यावेळी कोणालाही प्रत्यक्ष लस टोचण्यात आली नाही. 
- लसीकरणानंतरही निरीक्षण ठेवण्यासाठी किंवा प्रतिक्रियेसाठी संपर्क क्रमांक देण्यात आला. 
- संबंधित व्यक्तीवर लसीमुळे काही परिणाम दिसल्यास तातडीने वैद्यकीय व्यवस्था उपलब्ध 
- संपूर्ण लसीकरण ऑनलाइन पद्धतीने 
- दुसरा डोस देण्याची तयारी आहे.

प्रत्यक्ष कोणती लस देण्यात येणार आहे. याबद्दल शासनाकडूनही खुलासा झालेला नाही. मात्र, आजवरच्या लसीकरणाच्या पद्धतीचा अवलंब आम्ही केला असून, देशातील पोलिओसह आदी लसीकरणाच्या अनुभवाचा आरोग्य कर्माचाऱ्यांना दांडगा अनुभव आहे. 
- डॉ. अशोक नंदापुरकर, जिल्हा शल्यचिकित्सक

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India first dry run of corona vaccination was held in Pune