इराणच्या दुसऱ्या जहाजाला भारतात आश्रय एस. जयशंकर ः मानवतेच्या दृष्टिकोनातून मदत
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. ७ ः ‘‘पश्चिम आशियातील वाढत्या तणावादरम्यान हिंद महासागरात अमेरिकेच्या पाणबुडीने ज्या दिवशी इराणचे ‘आयरिस देना’ हे जहाज हल्ला करून बुडविले, त्याच काळात भारताने अशाच संकटात सापडलेल्या दुसऱ्या इराणी जहाजाला भारतीय बंदरात येण्याची परवानगी दिली,’’ अशी माहिती ‘देना’वरील हल्ल्यानंतर तीन दिवसांनी आज परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिली.
‘‘भारताच्या सागरी सीमेजवळ असलेल्या इराणच्या एका जहाजावर काही तांत्रिक समस्या निर्माण झाल्या असून त्याला भारताच्या बंदरात यायचे असल्याचा निरोप इराणकडून मिळाला आणि आम्ही त्यांना दुसऱ्या दिवशी, १ मार्च रोजी होकार कळविला. कोची बंदरात चार मार्च रोजी दाखल झालेले ते जहाज अजूनही तिथेच आहे. त्या जहाजावर बरेच तरुण शिकाऊ सैनिक होते,’’ असे जयशंकर यांनी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या ‘रायसिना डायलॉग’ परिषदेत बोलताना दिली. अचानक उद्भवलेल्या युद्धाच्या परिस्थितीत इराणचे ‘आयरिस लवण’ जहाज अडकले. संकटाच्या वेळी भारताकडे येण्याची विनंती केली, तेव्हा त्यांना मदत करणे मानवतेला अनुसरून होते, असे ते म्हणाले. त्या जहाजावरील १८३ कर्मचाऱ्यांची राहण्याची सोय सध्या कोचीतील नौदलाच्या इमारतींमध्ये करण्यात आली आहे.
‘भू-राजकीय वास्तव समजून घ्या’
जयशंकर यांनी हिंद महासागराच्या भू-राजकीय वास्तवाला समजून घेण्याचा सल्ला दिला. डिएगो गार्सिया हे ठिकाण गेल्या ५० वर्षांपासून हिंद महासागरात अस्तित्वात आहे. एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकाच्या सुरुवातीला जिबूती येथे परदेशी शक्तींची लष्करी ठिकाणे उभी राहिली आणि याच काळात हंबनटोटा बंदराचा विकासही झाला, याचे स्मरण करून देताना या प्रदेशातील गुंतागुंतीची परिस्थिती समजून घेत भारत आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

