औषध क्षेत्रात भारताला मोठी संधी

औषध क्षेत्रात भारताला मोठी संधी
Published on

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली, ता.२३ ः जगभरात औषधे आणि प्रगत उपचारांची मागणी पाहता भारताला खूप मोठी झेप घेण्याची संधी असल्याचे नीती आयोगाने आज प्रसिद्ध केलेल्या चौथ्या तिमाहीच्या व्यापार आढावा अहवालात म्हटले आहे.

या अहवालात प्रामुख्याने औषधांसाठी लागणारा कच्चा माल आणि औषध निर्मिती व्यापारावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. जागतिक स्तरावर औषधे आणि ‘एपीआय’ची एकूण आयात बाजारपेठ सुमारे १०८ लाख कोटी रुपये (१.३ हजार अब्ज डॉलरची) आहे. त्यात एकट्या ‘एपीआय’चा वाटा २६१.२ अब्ज डॉलर इतका आहे. औषध निर्मिती कंपन्यांचे मोठे जाळे, स्वस्त व जेनेरिक औषधे बनवण्यात जगात आघाडीवर आणि जागतिक आरोग्य साखळीत मजबूत स्थान यामुळे औषध निर्माण क्षेत्र हे भारताच्या अर्थव्यवस्थेचा एक मुख्य आधारस्तंभ बनले आहे. देशातील बहुतांश औषध उत्पादन आणि निर्यात करणारी तेलंगण, गुजरात आणि महाराष्ट्र ही तीन राज्ये भारताच्या औषध उद्योगाचे मुख्य आधारस्तंभ आहेत, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. तेलंगणा हे जीवरचना शास्त्र आणि लसींचे मोठे केंद्र बनले आहे. गुजरातने आपल्या मजबूत रासायनिक उद्योगाचा फायदा घेत औषध निर्यातीत आघाडी घेतली आहे, तर महाराष्ट्र हा मोठ्या प्रमाणावरील उत्पादन आणि उत्कृष्ट संशोधन या दोन्हीचा मेळ घालतो.

लाखो लोकांना रोजगार
भारताच्या एकूण जीडीपीमध्ये या क्षेत्राचा १.७ टक्क्यांपेक्षा जास्त वाटा आहे, तर उत्पादन क्षेत्राच्या एकूण मूल्यात ७.२ टक्क्यांचा वाटा आहे. या क्षेत्रामुळे देशातील सुमारे २७ लाख लोकांना रोजगार मिळाला असून भारताने सुमारे ३५.८ अब्ज डॉलर्सच्या औषधांची व एपीआयची निर्यात केली आहे. मात्र, जागतिक औषध निर्यातीत भारताचा एकूण वाटा अजूनही केवळ २.८ टक्के इतकाच मर्यादित आहे. जगातील एकूण औषध बाजारपेठेत ७५ टक्के मागणी ही तयार औषधांची आहे, तर उर्वरित २५ टक्के मागणी कच्च्या मालाची आहे. औषधांच्या जागतिक आयातीत भारताचा वाटा चार टक्के म्हणजे २२.६ अब्ज डॉलरचा आहे, असे या अहवालात नमूद केले आहे.
रक्त उत्पादने, लस आणि जैविक औषधांची जागतिक बाजारपेठ खूप वेगाने वाढून ३९०.२ अब्ज डॉलर्सवर पोहोचली असली तरी त्यात भारताच्या निर्यातीचा वाटा केवळ ०.६ टक्के आहे. प्रगत देशांमध्ये औषधे पाठवताना भारतीय कंपन्यांना ९५ टक्के वेळा कडक गुणवत्ता नियंत्रण, परवाने आणि तांत्रिक नियमांचा सामना करावा लागत असल्यामुळे खर्च वाढतो. भारतीय औषध कंपन्या आपल्या एकूण कमाईच्या केवळ ७ टक्के रक्कम संशोधनावर खर्च करतात, तर जागतिक स्तरावर हा खर्च १५ ते २० टक्के असतो. त्यामुळे भारत महागडी आणि प्रगत औषधे बनवण्यात मागे पडत असल्याचे अहवालात म्हटले आहे.


भारताचा जागतिक बाजारातील वाटा (आकडेवारी टक्क्यांमध्ये)
क्षेत्र भारताचा वाटा (%)
जैविक उत्पादने, लस व जैविक औषधे ०.६
हार्मोन्सशी संबंधित औषधे ०.३
औषधांचा कच्चा माल (एपीआय) ३.८


भारताची पेटंट नोंदणीतील वाढ
वर्ष पेटंट संख्या
२०१३ ४४०
२०२३ ३,५७६
पेटंटमध्ये १० वर्षांत ८ पट वाढ
पेटंट नोंदणीत जगातील पहिल्या १० देशांमध्ये स्थान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com