साखरनिर्यातीला कात्री

साखरनिर्यातीला कात्री
Published on

साखरनिर्यात संकटात
- सलग तीन हंगाम परिस्थिती कायम राहण्याची शक्यता
- एल निनो, इथेनॉल धोरणामुळे भारतातील साखर उपलब्धतेवर दबाव
मुंबई (वृत्तसंस्था) : एकेकाळी जगातील दुसरा सर्वात मोठा साखर निर्यातदार असलेल्या भारताला पुढील किमान तीन हंगाम साखर निर्यात करणे अवघड जाणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. ‘एल निनो’मुळे मॉन्सूनला निर्माण झालेला धोका आणि इथेनॉल उत्पादनासाठी वाढत चाललेली उसाची मागणी यामुळे देशांतर्गत साखर उपलब्धतेवर मोठा ताण येण्याची चिन्हे आहेत.
व्यापारी, साखर उद्योगातील अधिकारी, शेतकरी आणि सरकारी सूत्रांनी साखरनिर्यातीच्या भवितव्याबाबत साशंकता व्यक्त केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, आगामी काही वर्षे भारताकडे निर्यातीसाठी पुरेसा अतिरिक्त साखर साठा उपलब्ध राहणार नाही. त्यामुळे आशिया, आफ्रिका आणि मध्यपूर्वेतील आयातदार देशांना साखरेचा तुटवडा जाणवू शकतो. परिणामी, आंतरराष्ट्रीय पातळीवर साखर दर वधारण्याची शक्यता आहे.

पावसाच्या तुटीमुळे लागवडीवर परिणाम
यंदा ‘एल निनो’च्या प्रभावामुळे भारतातील मॉन्सून पर्जन्यमान गेल्या ११ वर्षांतील नीचांकी पातळीवर राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. जून महिन्यात देशभरात सरासरीपेक्षा ४० टक्क्यांहून अधिक पावसाची तूट नोंदविली गेल्याने अनेक शेतकऱ्यांनी ऊस लागवड पुढे ढकलली आहे.
महाराष्ट्राच्या ऊसपट्ट्यातील शेतकरीदेखील कमी पावसाच्या अंदाजामुळे नियोजित ऊस लागवड रद्द करून सोयाबीन पिकाची निवड करत असल्याचे चित्र आहे. गेल्या काही आठवड्यांत ऊस बेण्यांच्या मागणीत मोठी घट झाली असल्याचे निरीक्षण ऊस रोपवाटिकाधारकांनी नोंदविले आहे.
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी सांगितले की, शेतकरी कमी पाणी लागणाऱ्या पिकांकडे वळल्यास २०२७-२८ च्या हंगामात ऊस क्षेत्र आणि उपलब्धता दोन्हींत घट येऊ शकते.

साखर उत्पादन घटण्याचा अंदाज
साखर उद्योगाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, चालू हंगामात भारताचे साखर उत्पादन ३०.९५ दशलक्ष टन राहील, असे सुरुवातीला अपेक्षित होते. मात्र आता ते सुमारे २७.९ दशलक्ष टनांवर येण्याची शक्यता आहे. देशाचा वार्षिक साखर वापर सुमारे २८.५ दशलक्ष टन असल्याने उत्पादन आणि मागणी यामध्ये तफावत निर्माण होऊ शकते.
यामुळे १ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नव्या हंगामाच्या प्रारंभी साखर कारखान्यांकडे केवळ ३.५ दशलक्ष टन साठा राहण्याचा अंदाज आहे. हा साठा गेल्या तीन दशकांतील नीचांकी पातळीवरील साठा ठरू शकतो.

इथेनॉल धोरणामुळे वाढणार उसाची मागणी
केंद्र सरकारकडून पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण वाढविणे आणि फ्लेक्स-फ्युएल वाहनांचा प्रसार करणे, या दोन उद्दिष्टांवर भर देणे सुरू आहे. सध्या देशातील इथेनॉलची वार्षिक मागणी १२ ते १३ अब्ज लिटर इतकी आहे. ती २०३९-४० पर्यंत सुमारे ३० अब्ज लिटरपर्यंत पोहोचू शकते, असा उद्योगाचा अंदाज आहे.
अलीकडेच देशातील पहिली फ्लेक्स-फ्युएल प्रवासी कार आणि फ्लेक्स-फ्युएल दुचाकी बाजारात दाखल झाली आहे. त्यामुळे इथेनॉलची मागणी आणखी वेगाने वाढण्याची शक्यता आहे.
‘नॅचरल शुगर’चे व्यवस्थापकीय संचालक बी. बी. ठोंबरे यांच्या म्हणण्यानुसार, भविष्यातील सरकारी धोरणांचा कल साखर निर्यातीपेक्षा इथेनॉल उत्पादनाला प्राधान्य देणारा राहू शकतो.

साखर आयातीचीही शक्यता
‘एल निनो’मुळे ऊस क्षेत्र आणि उत्पादनात मोठी घट झाल्यास भारताला पुढील काही वर्षांत साखर आयात करण्याची वेळ येऊ शकते, अशी शक्यता साखर उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
भारताने यापूर्वी २०१६-१७ आणि २०१७-१८ मध्ये साखर आयात केली होती. त्यापूर्वी २००९ आणि २०१० मध्ये भारताकडून मोठ्या प्रमाणात झालेल्या आयातीमुळे जागतिक साखर दर जवळपास तिप्पट वाढले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com