पिरंगुटला ‘एज्युकेशन टू एम्प्लॉयमेंट’वर परिषद
पिरंगुट, ता. ६ : ‘‘आज भारताकडे जगातील सर्वाधिक तरुणांची ताकद आहे. योग्य शिक्षण, प्रशिक्षण आणि संधी मिळाल्यास हे तरुण केवळ भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगाच्या विकासात मोठे योगदान देऊ शकतात. एआयसारखे नवीन तंत्रज्ञान वेगाने वाढत असल्याने अनेक उद्योग काळानुरुप बदलत आहेत. त्यामुळे शिक्षणात नवकल्पना, तंत्रज्ञानाची समज, उद्योजकता आणि काळानुरुप बदलांना जुळवून घेण्याची क्षमता यावर अधिक भर दिला पाहिजे,’’ असे प्रतिपादन पुण्यातील प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी डॉ. विनोदकुमार गायकवाड यांनी केले.
पिरंगुट (ता. मुळशी) येथील ‘पीआयबीएम’तर्फे आयोजित केलेल्या एज्युकेशन टू एम्प्लॉयमेंट-बिल्डिंग फ्युचर-रेडी युथ इन ब्रिक्स अँड अदर पार्टनर कंट्रीज या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ. गायकवाड बोलत होते.
आशिया, आफ्रिका, युरोप आणि लॅटिन अमेरिकेसह विविध देशांच्या प्रतिनिधींची या परिषदेत शिक्षण आणि नोकरी यांच्यातील अंतर कमी करण्याची गरज, कौशल्य विकास, तंत्रज्ञानाची माहिती आणि देशांमधील सहकार्य यावर चर्चा झाली.
यावेळी पीआयबीएम समूहाचे अध्यक्ष रमणप्रीत म्हणाले, “तरुणांमध्ये योग्य कौशल्ये विकसित करणे हे जगासमोर मोठे आव्हान आहे. अनेक विकसनशील देशांमध्ये लघु आणि मध्यम उद्योग (एसएमई) अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देतात. युवक वर्गासाठी योग्य कौशल्ये विकसित केली नाहीत तर त्याचा थेट परिणाम विविध देशांच्या जीडीपी वाढीवर होईल.”
या परिषदेत रमणप्रीत यांनी आंतरराष्ट्रीय सहकार्याने ‘बिझनेस सेंटर ऑफ एक्सलन्स’ तयार करण्याचा प्रस्ताव मांडला. ही केंद्रे वेगवेगळ्या उद्योगांवर लक्ष केंद्रित करतील आणि नवीन कल्पना, उत्तम व्यवसाय पद्धती आणि आधुनिक उपाय विकसित करण्यास मदत करतील.
यावेळी सर्व देशांनी एकत्र काम करून शिक्षणातून रोजगारापर्यंतचा मजबूत मार्ग तयार करण्याचे आवाहन करण्यात आले. याप्रसंगी जीआयबीएफचे अध्यक्ष जितेंद्र जोशी, नायजेरियाचे कार्यवाह उच्चायुक्त उबोंग अकपन जॉनी, बुर्किना फासोचे राजदूत डॉ. डिजायर बोनिफेस सोम, व्हिएतनामचे राजदूत गुयेन थान हाय, फेडरेशनचे कॉन्सुल जनरल इव्हान वाय फेटिसोव्ह तसेच अन्य विविध देशांतील प्रतिनिधी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

