पुण्यात आलेला गवा कसा गेला, वाचा सविस्तर

Indian-Bison
Indian-Bison

पुणे - शहरात पुन्हा गवा आला रे आला... हे ऐकताच पुणेकरांमध्ये धांदल उडाली. बावधान येथील एचईएमआरएल पाषाण तलावालगत असलेल्या भिंती जवळ मंगळवारी हा गवा आढळून आला. मात्र या गव्याला सुखरूप त्याच्या नैसर्गिक अधिवासात घालविण्यात वन विभागाला यश मिळाले आहे.

शहरात दोनच आठवड्यात गवा येण्याची ही दुसरी घटना घडली आहे. त्यामुळे गव्याला पाहण्यासाठी पुन्हा नागरिकांची गर्दी या परिसरात वाढली होती. परंतु यावेळी वन विभाग सज्ज झाले होते आणि चपळतेनी वन विभागाच्या कर्मचारी व रेस्क्‍यू टिमतर्फे या परिस्थितीला हाताळण्यात आले. तसेच नागरिकांच्या गर्दीमुळे गवा मुख्य रस्त्यावर किंवा मानवी वस्तीत शिरू नये हा यशस्वी प्रयत्न करण्यात आला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

असा गेला गवा...
शहराकडे गवा येऊ नये याकरिता वनविभाग आणि रेस्क्‍यू टिमकडून विशेष प्रयत्न करण्यात आले. यासाठी वन्यविभागातील कर्मचाऱ्यांना वन्यप्राण्यांसंदर्भात प्रशिक्षण देण्यात येत आहे. तर मंगळवारी आढळलेल्या गव्याला सुखरूप जंगलात पाठविण्यासाठी वन विभागातर्फे एचईएमआरएल परिसरात असलेल्या वन भागात लोखंडी जाळी, पत्रे आणि बांबूच्या साहाय्याने कुंपण तयार करण्यात आले. तसेच लाल कापड लावण्यात आले. शहरात गवा येऊ नये तो जंगलाच्या दिशेनेच जावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न वन विभागाने केले. तसेच अनेक तासांच्या प्रयत्नामुळे या गव्याला पुन्हा जंगलात जाण्यास मार्ग मिळाला.

मागील घटनेतून घेतला धडा...
शहरात 9 डिसेंबर रोजी कोथरूड परिसरात शिरलेल्या गव्याला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. मात्र या गर्दीला पाहून बिथरलेल्या गव्याने थेट मुख्य रस्त्यावर धावण्यास सुरवात केली. सतत धावल्यामुळे आणि इजांमुळे या गव्याला थकवा आला होता. त्यामुळे श्‍वसनाशी संबंधित त्रास ही झाला होता. त्यात वन विभागाने गव्याला तीन डार्ट मारून बेशुद्ध करून ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्या गव्याचा मृत्यू झाला. तर मागे झालेला प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी वन विभागाने त्यांना देण्यात आलेल्या वन्यप्राण्यांसंबंधिच्या प्रशिक्षणाला यावेळी अमलात आणले. तसेच त्याला कोणतीही इजा होणार नाही याची संपूर्ण काळजी देखिल घेतली होती.

'गवा हा एक लाजाळू प्राणी आहे व तो इजा करत नाही. त्यामुळे, शहरात हा वन्यप्राणी आल्यावर नागरिकांनी गोंधळ न करता वन विभागाला वेळेत याबाबत माहिती दिली पाहिजे. सध्या गव्यांचा अभ्यास सुरू असून या वन्यप्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे प्रात्यक्षिके वन्य विभागातर्फे घेण्यात येत असून या प्रशिक्षणाचा वापर आज प्रत्यक्षात करता आला. त्यात वन विभागाला यशही मिळाले आहे.''
- राहुल पाटील, उपवनसंरक्षक - पुणे वन विभाग

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com