सिंगापूरला भारतीय कर्करुग्ण वाढले

सिंगापूरला भारतीय कर्करुग्ण वाढले
Published on

सिंगापूरमध्ये उपचारासाठी
भारतीय कर्करुग्णसंख्येत वाढ

सुमारे ७० टक्के रुग्णांत कर्करोग प्रगत अवस्थेत

कोलकता, ता. ४ (पीटीआय) : सिंगापूरस्थित एका कर्करोग उपचार केंद्रात २०२५ मध्ये भारतीय रुग्णांच्या संख्येत मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. या रुग्णांपैकी बहुतांश जण कर्करोगाच्या प्रगत अवस्थेत उपचारासाठी येत असल्याने त्यांच्यासाठी उपचारातून पूर्ण बरे होण्याच्या शक्यता तुलनेने कमी राहतात, अशी माहिती केंद्राचे वैद्यकीय संचालक डॉ. आंग पेंग तियाम यांनी दिली.

‘पार्कवे कॅन्सर सेंटर’चे वैद्यकीय संचालक आणि ज्येष्ठ वैद्यकीय कर्करोगतज्ज्ञ डॉ. तियाम यांनी सांगितले की, भारतातील उपलब्ध उपचारांच्या शक्यता संपल्यानंतर अनेक रुग्ण परदेशात उपचारासाठी येतात. “अनेक प्रकरणांत भारतातील डॉक्टरांनी शक्य ते सर्व उपचार केलेले असतात. वेगळ्या वैद्यकीय पथकाकडून आणखी एखादा दृष्टिकोन किंवा उपचारपद्धती मिळू शकेल, या आशेने रुग्ण येथे येतात.”

‘पार्कवे कॅन्सर सेंटर’ हे जागतिक आरोग्यसेवा क्षेत्रातील ‘आयएचएच हेल्थकेअर’चा भाग आहे. कर्करोग, त्याचे प्रतिबंध, निदान आणि उपचार याबाबत जनजागृती करण्यासाठी या केंद्राचे दिल्ली येथे ‘कॅनहोप’ कार्यालय आहे. गेल्या वर्षी केंद्राने भारतात अशी आणखी कार्यालये सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली होती. पीटीआयशी बोलताना डॉ. तियाम यांनी सांगितले, की पार्कवे कॅन्सर सेंटरकडे उपचारासाठी येणाऱ्या भारतीय रुग्णांपैकी सुमारे ६० ते ७० टक्के रुग्ण प्रगत अवस्थेतील किंवा उपचारांना प्रतिसाद न देणाऱ्या कर्करोगाने ग्रस्त असतात. केवळ सुमारे ३० टक्के रुग्णांमध्ये कर्करोग बरा होण्याची शक्यता असते. भारतीय रुग्णसंख्येत वर्षभरात जवळपास २० टक्क्यांची वाढ झाली.

अचूक निदान अत्यंत महत्त्वाचे

कर्करोगाच्या उपचारांमध्ये सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे अचूक निदान, असे डॉ. तियाम यांनी स्पष्ट केले. त्यामध्ये ऊतकांच्या नमुन्याची अचूक सूक्ष्म तपासणी, कर्करोगाची अवस्था निश्चित करणे आणि आता वाढत्या प्रमाणात आनुवंशिक-आण्विक तपासणी यांचा समावेश होतो. “काही रुग्ण सुरुवातीच्या अवस्थेतील आजार घेऊन येतात, तर काही जण उपचार अयशस्वी झाल्यानंतर अत्यंत निराश अवस्थेत येतात आणि अजून काही उपचाराचे पर्याय उपलब्ध आहेत का, याचा शोध घेतात,” असे त्यांनी सांगितले. कर्करोग सुरुवातीच्या अवस्थेत आढळल्यास तो अनेकदा पूर्णपणे बरा करता येतो. मात्र, उशिरा निदान होणे हे मोठे आव्हान आहे, असे डॉ. तियाम यांनी सांगितले.


चौथ्या अवस्थेतील कर्करोगातही आशा

प्रगत अवस्थेतील कर्करोग म्हणजे उपचाराची कोणतीही आशा नाही, असे मानणे योग्य नाही. आनुवंशिक-आण्विक तपासण्यांमुळे अनेक रुग्णांसाठी उपचारांचे नवे पर्याय उपलब्ध झाले आहेत, असे डॉ. तियाम यांनी सांगितले. “चौथ्या अवस्थेतील कर्करोग हा एकच आजार नाही. आनुवंशिक-आण्विक तपासणीमुळे विशिष्ट लक्ष्यित उपचारांना अत्यंत चांगला प्रतिसाद देणारे रुग्ण ओळखता येतात,” असे त्यांनी स्पष्ट केले. फुप्फुसाच्या कर्करोगाचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, आरओएस-१ किंवा एएलकेसारख्या विशिष्ट जनुकीय बदल असलेल्या काही रुग्णांना तोंडावाटे घेण्याच्या औषधांमुळे अनेक वर्षे जगता येते. “चौथ्या अवस्थेतील फुप्फुसाचा कर्करोग म्हणजे आशाच नाही, असे अनेकांना वाटते. मात्र योग्य उपचार मिळाल्यास काही रुग्ण चांगल्या जीवनमानासह १०, १५ किंवा २० वर्षेही जगू शकतात,” असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com