
भारतीय नौदलाच्या पाण्याखालील लक्ष्य शोधण्याच्या मोहिमा आता अधिक सोप्या
पुणे : भारतीय नौदलाच्या पाण्याखालील लक्ष्य शोधण्याच्या मोहिमा आता अधिक अचूक व सोप्या होणार आहेत. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) कोची येथील नेव्हल फिजिकल अँड ओशनोग्राफी प्रयोगशाळा (एनपीओएल) आणि कोची युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांच्या वतीने एक आधुनिक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. यामुळे उथळ पाण्यातील लक्ष्याच्या प्रतिध्वनींना शोधणे अत्यंत सोपे होऊन जाते.
समुद्रात कमी खोल पाण्यातील लक्ष्य शोधण्यासाठी ‘टोव्ड ॲरे सोनार’च्या वापराला अधिक प्राधान्य दिले जाते. परंतु या उपकरणाला ओढून नेणाऱ्या जहाजाच्या सिग्नल किंवा आवाजामुळे यावर मर्यादा येतात. जहाजाच्या आवाजामुळे पाण्याखालील मूळ लक्ष्य शोधणे आव्हानात्मक होऊन जाते. ही समस्या लक्षात घेता एनपीओएल मार्फत संशोधन करण्यात आले असून ‘स्पॅशिओ-टेम्पोरल प्रोसेसिंग टेक्निक कंबाईन्ड विथ सबस्पेस’ या प्रणालीचा विकास करण्यात आला आहे. या संशोधनाबाबतची माहिती नुकतीच ‘डिफेन्स सायन्स जर्नल’मध्ये प्रकाशित करण्यात आली आहे. त्यानुसार टोव्ड ॲरे सोनारला ओढून नेणाऱ्या जहाजाचा आवाज कमी करण्यासाठी या प्रणालीचा वापर केला जाऊ शकतो. तसेच खोल समुद्रात असलेल्या लक्ष्याच्या सूक्ष्म प्रतिध्वनींचा शोध घेणे शक्य होणार आहे.
सागरी सीमा, संपदा यांच्या संरक्षणासाठी नौदल प्रतिबद्ध आहे. मात्र, जागतिक स्तरावर युद्धाचे स्वरूप बदलत असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासावर विविध देशांद्वारे भर दिला जात असून आज मानवरहित पाण्याखालील वाहने, पाणबुड्या यांचा वापर शत्रू देश करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये उथळ पाण्याच्या सीमांचे संरक्षण अतिशय महत्त्वाचे आहे. त्या अनुषंगाने अद्ययावत तंत्रज्ञान विकसित करत सोनारच्या वापराची क्षमता अधिक व अचूक करण्यासाठी हे संशोधन करत नवीन प्रणाली विकसित करण्यात आली. या प्रणालीच्या चाचण्या देखील झाल्या असून भविष्यात नौदलाच्या सागरी मोहिमांसाठी हे अत्यंत महत्त्वाचे संशोधन ठरले आहे.
जमिनीवरील मानवरहित वाहनांप्रमाणे आता पाण्याखालील मानवरहित वाहने देखील आली आहेत. यामुळे सागरी सीमा आणि संपदेचे संरक्षण हे काळाची गरज झाली आहे. सागरी सीमेची पाहणी, सागरी आर्थिक संपदा नष्ट करणे व समुद्राच्या मार्गातून घुसखोरी अशा विविध कारणांसाठी या वाहनांचा वापर केला जाऊ शकतो. अशा वेळी टोव्ड ॲरे सोनारसाठी तयार करण्यात आलेल्या प्रणालीचा वापर अत्यंत महत्त्वाचा ठरतो.’’
- कमोडोर एस. एल. देशमुख (निवृत्त), संरक्षण तज्ज्ञ
वापरले जाणारे ‘सोनार’
ॲक्टिव्ह सोनार
पॅसिव्ह सोनार
टोव्ड ॲरे सोनार
या नवीन प्रणालीचा उपयोग
पाण्याखालील लक्ष्याचा अचूक वेध घेणे
लक्ष्याची दिशा व स्थान याची अचूक माहिती लक्ष्य विध्वंसक प्रणालीला देणे
समुद्र तळावर होणाऱ्या घडामोडींवर पाळत ठेवणे
संयुक्त सागरी डोमेन जागृकता (एमडीए) ठेवत, अचूक माहिती सातत्याने एमडीए समन्वय केंद्राला पाठविणे
महत्त्वाच्या बाबी
टोव्ड ॲरे सोनारची लक्ष्य शोधण्याच्या क्षमतेमध्ये लक्षणीय वाढ
शत्रूच्या पाणबुड्या, मानव रहित पाण्याखालील वाहन, यंत्र साहाय्याने येणारे पाणबुड्या किंवा समुद्राच्या तळाशी असलेले लक्ष्य शोधणे शक्य