

नवी दिल्ली, ता.२५ (वृत्तसंस्था) ः भारतीय औषधकोशामध्ये (इंडियन फार्माकोपिया-२०२६) रक्त आणि रक्तातील घटकांसाठी विशेष मानके निश्चित करण्यात आली असून, अशा प्रकारचा निर्णय घेणारा हा जगातील पहिलाच औषधकोश ठरला आहे. रक्तसंक्रमण सेवांची गुणवत्ता वाढविण्यासाठी आणि रुग्णांच्या सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. औषधांच्या गुणवत्तेच्या मानकांचा अधिकृत संग्रह म्हणजे ‘फार्माकोपिया’ होय. यातील मानकांनुसार औषधांची ओळख, शुद्धता आणि क्षमता सुनिश्चित केली जाते.
गाझियाबाद येथील ‘इंडियन फार्माकोपिया कमिशन’च्या (आयपीसी) आवारात आयोजित राष्ट्रीय परिषदेत या नवीन मानकांवर प्रकाश टाकण्यात आला. ‘आयपी-२०२६’ मधील रक्त आणि रक्तातील घटकांसाठीच्या नवीन मानकांची अंमलबजावणी आणि त्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव (औषध आणि अन्न नियमन) हर्ष मंगला यांनी या परिषदेला दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. या परिषदेला उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, हरियाना, पंजाब आणि मध्य प्रदेशातील रक्तपेढी व्यावसायिक, गुणवत्ता नियंत्रण अधिकारी, राज्य परवाना प्राधिकरण, ‘हेमोव्हिजिलन्स’ तज्ज्ञ आणि सरकारी आरोग्य अधिकाऱ्यांसह १६० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.
कोट
नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या मानकांमुळे रक्तसंक्रमण सेवांमधील गुणवत्ता, रुग्णांची सुरक्षा आणि नियामक पालनाला बळकटी मिळेल. ही मानके आधुनिक वैज्ञानिक प्रगती आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय नियामक गरजा लक्षात घेऊन विकसित करण्यात आली आहेत.
- डॉ. व्ही. कलैसेल्वन, ‘आयपीसी’चे सचिव आणि वैज्ञानिक संचालक
विविध विषयांवर चर्चासत्रे
या परिषदेत ‘आयपी- २०२६’ मधील रक्ताची मानके, नियामक गरजा, रक्ताचा तर्कसंगत वापर, प्लाझ्मा गुणवत्ता, ‘नॅशनल फॉर्म्युलरी ऑफ इंडिया’, ‘हेमोव्हिजिलन्स प्रोग्राम ऑफ इंडिया’ आणि ‘आयपी ऑनलाइन’ या विषयांवर चर्चासत्रे पार पडली. तसेच, ‘आयपीसी’चे तज्ज्ञ, राज्य परवाना प्राधिकरण आणि रक्तसंक्रमण संस्थांच्या प्रतिनिधींनी अंमलबजावणी धोरणांवर चर्चा केली. देशभरातील रक्ताची गुणवत्ता, सुरक्षितता आणि परिणामकारकता वाढविण्यासाठी नवीन मानकांचा प्रभावी अवलंब करण्यास ही परिषद उपयुक्त ठरेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.