esakal | कर्करोगाच्या उपचारासाठी नवीन पद्धतीचा शोध; भारतीय शास्त्रज्ञांची कामगिरी 
sakal

बोलून बातमी शोधा

कर्करोगाच्या उपचारासाठी नवीन पद्धतीचा शोध; भारतीय शास्त्रज्ञांची कामगिरी 

पेशींवर आढळणाऱ्या ‘फायब्युलन’ प्रथिनांवर पुण्यातील आयसर संस्थेत संशोधन झाले आहे. कर्करोगाशी या प्रथिनांचा निकटचा संबंध असून, त्याचा थेट परिणाम उपचार पद्धतीवर होणार असल्याचे प्रथमच सिद्ध झाले आहे. 

कर्करोगाच्या उपचारासाठी नवीन पद्धतीचा शोध; भारतीय शास्त्रज्ञांची कामगिरी 

sakal_logo
By
सम्राट कदम : सकाळ वृत्तसेवा

पुणे - कर्करोगावर अचूक आणि प्रभावी उपचार करणाऱ्या नवीन पद्धतीचा शोध भारतीय शास्त्रज्ञांनी घेतला आहे. पेशींवर आढळणाऱ्या ‘फायब्युलन’ प्रथिनांवर पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेत (आयसर) संशोधन झाले आहे. कर्करोगाशी या प्रथिनांचा निकटचा संबंध असून, त्याचा थेट परिणाम उपचार पद्धतीवर होणार असल्याचे प्रथमच सिद्ध झाले आहे. 

आयसरच्या डॉ. कीर्ती हरिकृष्णन आणि डॉ. नागराज बालसुब्रह्मण्यम यांनी हे संशोधन केले असून ओंकार जोशी आणि सायली मदनगिरीकर या विद्यार्थ्यांचा संशोधनात सहभाग आहे. दहा वर्षांपूर्वी पेशींजवळ आढळलेल्या या प्रथिनांवर प्रथमच असे संशोधन झाल्याचे शास्त्रज्ञ सांगतात. संशोधनासाठी फुप्फुसाच्या पेशींची निवड करण्यात आली होती. संबंधित संशोधन ‘फ्रंटीयर सेल डिव्हिजन बायोलॉजी’ या आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेत नुकतेच प्रकाशित झाले आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संशोधनाची पार्श्वभूमी : 
पेशींना आधार देण्याबरोबरच भोवतीच्या वातावरणाशी संवाद साधण्यासाठी प्रथिनांद्वारे एक जाळी (मॅट्रिक्स) तयार करण्यात येते. प्रत्येक अवयवाच्या पेशींसाठी ही जाळी वेगळी असते. जाळीच्या जडणघडणीवर पेशींच्या रासायनिक अभिक्रिया, संदेशवहन आणि विकास अवलंबून असतो. कर्करोगामध्ये पेशींची अनियंत्रित वाढ होते. ही अनियंत्रित वाढ थेट अशा जाळीशी निगडित असते. कर्करोगाचा प्रसार आणि उपचारासाठी शास्त्रज्ञ अशा जाळीतील प्रथिनांचा अभ्यास करत आहेत. आजवर ‘कॉलेजन’ या प्रथिनांवर भरपूर संशोधन झाले आहे, परंतु कर्करोगाशी निगडित असलेल्या ‘फायब्युलन’ प्रथिनावरील आजवर संशोधन झाले नाही. आयसरच्या शास्त्रज्ञांनी प्रथमच हे प्रथिने आणि कर्करोग यांचा थेट संबंध असल्याचे सिद्ध केले. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संशोधनाचे निष्कर्ष : 
- पेशींभोवतीच्या जाळीमध्ये (मॅट्रिक्स) ‘फायब्युलन’ची मात्रा वाढल्यास पेशींवर आढळणारे ‘इजीएफआर’ नावाचे संग्राहक (रिसेप्टर) सक्रिय होते. त्यामुळे पेशींच्या विभाजनाला सुरुवात होते. 
- जाळीमधील फायब्युलन ची मात्रा कमी-जास्त झाल्यास पेशींमध्येही त्याचा परिणाम होतो. 

संशोधनाचे फायदे : 
- कर्करोगावरील उपचारासाठी शास्त्रज्ञांना आता 'फायब्युलन' प्रथिनावरही काम करावे लागणार 
- कर्करोगाशी निगडित औषधांना अधिक प्रभावी बनविण्यासाठी त्यांचा या प्रथिनासोबतचा व्यवहारही तपासावा लागेल. पर्यायाने औषधे अधिक प्रभावी होतील. 

फायब्युलन प्रथिनाच्या दोन प्रकारांवर आम्ही हे संशोधन केले आहे. आजवर फारसे अपरिचित असलेल्या या प्रथिनांची कर्करोगासंबंधीची भूमिका प्रथमच स्पष्ट झाली आहे. भविष्यात याद्वारे उपचारासाठी नवीन पद्धत विकसित होईल. 
- डॉ.नागराज बालसुब्रह्मण्यम, शास्त्रज्ञ, आयसर, पुणे. 

loading image
go to top