Pune | योग आणि आयुर्वेद संशोधनावरही भारताचा भर; धर्मेंद्र प्रधान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dharmendra pradhan
योग आणि आयुर्वेद संशोधनावरही भारताचा भर; धर्मेंद्र प्रधान

योग आणि आयुर्वेद संशोधनावरही भारताचा भर; धर्मेंद्र प्रधान

पुणे - भारताने कृत्रिम बुद्धीमत्तेच्या माध्यमातून तंत्रज्ञान क्षेत्रात भर देण्याबाबरोबरच सामाजिक सुधारणा करण्यासाठी योग आणि आयुर्वेद यांच्यावरही भर दिला असल्याचे मत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ऑनलाईन पध्दतीने ‘इंडो-फ्रेंच नॉलेज समिट’ ला बुधवारी सुरुवात झाली. त्यावेळी धर्मेंद्र प्रधान बोलत होते. यावेळी फ्रान्सचे उच्चशिक्षण, संशोधन व नवसंशोधनमंत्री फेडरिक्यु विडाल, केंद्र सरकारच्या पृथ्वी विज्ञान व विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ. एम.रवीचंद्रन, कुलगुरू डॉ. नितीन करमळकर उपस्थित होते. यावेळी रवीचंद्रन म्हणाले,‘‘भारत संशोधन निबंध प्रसिद्ध करण्यात जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे,

यावरून भारताचे संशोधनातील कार्य अधोरेखित होते.’ या तीन दिवसीय परिषदेत आरोग्य (संसर्गजन्य आजार), सागरी विज्ञान, कृत्रिम बुद्धीमत्ता, शाश्वत ऊर्जा, हरित रसायनशास्त्र, जैवतंत्रज्ञान आणि नैसर्गिक संसाधने आदी विषयांवर चर्चा होणार आहे.

हेही वाचा: पुण्यातील इंजिनियर वाचवत आहे करोडो लिटर;पाहा व्हिडिओ

यातून अनेक सामंजस्य करार, एकत्रित संशोधन प्रकल्प हाती घेण्यासंदर्भात ठराव केले जातील. परिषदेच्या पहिल्या दिवशी ‘इंडो फ्रेंच सायंटिफिक कोऑपरेशन इन२०२१’ या विषयावर देशाचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार प्रा. विजयराघवन, फ्रान्सच्या शिक्षण, विज्ञान व संस्कृती विभागाचे डॉ. निकोलस घेरार्डी, ‘इंडो फ्रेंच सेन्टर फॉर द प्रमोशन ऑफ ऍडव्हान्स रिसर्च’च्या संचालिका डॉ. पौर्णिमा रुपल यांनी आपले विचार मांडले. विद्यापीठाच्या वतीने प्र-कुलगुरू डॉ. एन.एस.उमराणी, अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर, डॉ. पराग काळकर आदीं कार्यक्रमाला हजेरी लावली होती. सूत्रसंचालन डॉ. अपूर्वा पालकर यांनी केले.

‘नॉलेज समिट’च्या माध्यमातून आरोग्य क्षेत्राबरोबरच सागरी विज्ञान, कृत्रिम बुद्धीमत्ता, शाश्वत ऊर्जा, हरित रसायनशास्त्र, जैवतंत्रज्ञान आणि नैसर्गिक संसाधने या क्षेत्रातील कमतरतांवर काम करण्याची ही संधी आहे. या माध्यमातून 'इंटरडिसीप्लिनरी रिसर्च' विद्यापीठात केला जात आहे.

- प्रा. डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

फ्रान्स देशाने कोव्हिड काळात भारतीय विद्यार्थी व संशोधकांच्या संशोधनाला अधिक प्राधान्य दिले आहे. फ्रान्सने पुढील १० वर्षात आंतरराष्ट्रीय अभ्यासकांसाठी २५ अब्ज युरोची तरतूद केली आहे. २०२५ सालापर्यंत फ्रान्समध्ये संशोधनाला जाणाऱ्या भारतीय संशोधकांची संख्या दुप्पट करण्याचा आमचा मानस आहे.

- फेडरिक्यु विडाल, उच्चशिक्षण व नवसंशोधन मंत्री, फ्रांस

loading image
go to top