esakal | पुण्यात साकारणार स्वदेशी ‘थ्रीडी प्रिंटर’

बोलून बातमी शोधा

Indigenous 3D printer to be launched in Pune}

केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीत येणारी ‘सी-मेट’ची प्रयोगशाळा आणि भुवनेश्वर येथील इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स (सीआयपीईटी) या संस्था यासंबंधीचे संशोधन करणार आहे

पुण्यात साकारणार स्वदेशी ‘थ्रीडी प्रिंटर’
sakal_logo
By
सम्राट कदम

पुणे : देशाचा पहिला स्वदेशी थ्रीडी प्रिंटर (त्रिमितीय) तयार करण्यासाठी भारतीय शास्त्रज्ञांनी कंबर कसली असून, त्यासाठी आवश्यक पदार्थ विकसित करण्यासाठी पुण्यात प्रगत संशोधन केंद्र उभारण्यात येत आहे. पाषाण येथील ‘सेंटर फॉर मटेरिअल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी’च्या (सी-मेट) आवारात ही अत्याधुनिक प्रयोगशाळा आकार घेत आहे. पुढील तीन ते पाच वर्षांत पूर्णतःस्वदेशी थ्रीडी प्रिंटर बाजारात आणण्याचा शास्त्रज्ञांचा मानस आहे.

केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीत येणारी ‘सी-मेट’ची प्रयोगशाळा आणि भुवनेश्वर येथील इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स (सीआयपीईटी) या संस्था यासंबंधीचे संशोधन करणार आहे. थ्रीडी प्रिंटर प्रत्यक्षात बाजारात उतरवण्यासाठी बंगळूर येथील इंटेक अॅडीटीव्ह, पुण्यातील एसपीईएल आणि मुंबईतील जे रोबोटीक्स या कंपन्याही सहभागी असल्याचे सी-मेटचे महासंचालक डॉ. भारत काळे यांनी सांगितले आहे.

थ्री-डी प्रिंटीगची आवश्यकता
- इलेक्ट्रॉनिक्स, वैद्यकीय, संशोधन, ज्वेलरी, वाहन उद्योग, संरक्षण आदींमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर
- अतिशय कमी किमतीत जास्त वस्तूंचे उत्पादन करता येते
- गुंतागुंतीची, क्लिष्ट आणि नाजूक वस्तू अथवा विशिष्ट भागाची निर्मिती करता येते
- सध्या चीन, अमेरिका आणि जर्मनीमधून थ्रीडी प्रिंटर आणि पदार्थांची आयात होते

स्वदेशी तंत्रज्ञानाचा फायदा
- उद्योगांना हे तंत्रज्ञान स्वस्तात उपलब्ध होईल; परकीय गंगाजळी वाचेल
- थ्री-डी प्रिंटर बरोबरच इतर आवश्यक साहित्याच्या बाजारपेठेला चालना मिळेल
- उद्योगांना अत्यंत प्रगतशील तंत्रज्ञान मिळेल, रोजगार निर्मितीत वाढ
- थ्रीडी प्रिंटिंगसाठी आवश्यक सिरॅमिक आणि मेटल्सचीही निर्मिती करणार


काय आहे थ्री-डी प्रिंटिंग तंत्रज्ञान?
अॅडीटीव्ह मॅन्युफॅक्चरिंग (एएम) नावाने ओळखल्या जाणाऱ्या या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून, पदार्थांची त्रिमितीय रचना साकारल्या जातात. ज्यामध्ये संगणकाच्या माध्यमातून द्रव पदार्थांच्या कणांना एकत्र करून विशिष्ट रचना अथवा वस्तू साकारली जाते. एक प्रकारे कागदावरील प्रिंटिंग ऐवजी वस्तूंचेच त्रिमितीय प्रिंटिंग केले जाते.

थ्री-डी प्रिंटिगची बाजारपेठ
२०२० मध्ये (जागतिक) - १३.७ अब्ज डॉलर
२०२६ मध्ये अपेक्षीत (जागतिक) - ६३.४६ अब्ज डॉलर
२०२१ मध्ये भारतात - ५८६ कोटी

थ्री-डी प्रिंटिंगच्या स्वदेशी तंत्रज्ञानाच्या प्रत्यक्ष वापरासाठी ते व्यावसायिक कसोट्यांवर यशस्वी व्हायला हवे. त्यासाठी आवश्यक असलेले सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञान, डिझाइन आणि अभियांत्रिकी, पुरवठा साखळी, माहिती तंत्रज्ञान आदी क्षेत्रांचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरत आहे. लवकरच हे तंत्रज्ञान आम्ही उद्योगांच्या मदतीने बाजारात आणत आहोत.
- डॉ. भारत काळे, महासंचालक, सी-मेट