.

.
Published on

आत्मनिर्भर शस्त्रांचे पाऊल पडते पुढे...

‘दिव्यास्त्र एम-के३’, ‘यूएलपीजीएम-व्ही-३’च्या यशस्वी चाचण्या

लखनौ, ता. १६ (पीटीआय) : लक्ष्याचा शोध घेत असताना घिरट्या घालत अचूक हल्ला करणाऱ्या अर्थात ‘लोइटरिंग म्युनिशन’ ‘दिव्यास्त्र एमके-३’ची भारताने यशस्वी चाचणी केली आहे. ‘कावा यूएव्ही प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीने तयार केलेले हे शस्त्र पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानातून भारतात विकसित करण्यात आले आहे. याशिवाय ‘डीआरडीओ’ने मानवरहित विमानातून करण्यात येणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे.
‘दिव्यास्त्र’ प्रकल्पाची खास बाब म्हणजे, प्रकल्प सुरू झाल्यापासून अवघ्या एका वर्षाच्या विक्रमी वेळेत ही चाचणी पार पडली. यामध्ये ‘डीजी प्रोपल्शन’ने पूर्णपणे भारतात विकसित केलेल्या स्वदेशी जेट इंजिनचा वापर करण्यात आला आहे. यात कोणत्याही परदेशी यंत्रणेचा किंवा आयातीचा वापर करण्यात आलेला नाही. कंपनीच्या सहसंस्थापकांनी या यशाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, ही केवळ चाचणी नसून स्वदेशी संरक्षण उत्पादन क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा आहे. भारत स्वतःच्या भूमीत जेट इंजिनावर आधारित अचूक लक्ष्यभेदी हल्ला प्रणालीची संकल्पना मांडू शकतो, तिची निर्मिती करू शकतो आणि ती प्रत्यक्षात आणू शकतो, हे या चाचणीने सिद्ध केले आहे. ‘दिव्यास्त्र एमके-३’ हे संरक्षण क्षेत्रातील ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेचे उदाहरण असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) आपल्या मानवरहित विमानातून प्रक्षेपित करता येणाऱ्या अचूक लक्ष्यभेदी क्षेपणास्त्राच्या (यूएलपीजीएम-व्ही-३) अंतिम चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत. आंध्र प्रदेशातील कर्नुल येथील ‘डीआरडीओ’च्या चाचणी केंद्रावर हवेतून जमिनीवर आणि हवेतून हवेत अशा दोन्ही प्रकारच्या लक्ष्यभेदी चाचण्या पार पडल्या.

‘डीआरडीओ’च्या चाचणीबद्दल...

-क्षेपणास्त्राच्या हालचाली, नियंत्रण आणि स्वयंचलित प्रक्षेपणासाठी अत्याधुनिक जीसीएस प्रणालीचा यशस्वी वापर
-क्षेपणास्त्राच्या निर्मितीसाठी ‘डीआरडीओ’ने भारत डायनॅमिक्स लिमिटेड (हैदराबाद) आणि अदानी डिफेन्स सिस्टीम्स अँड टेक्नॉलॉजीज लिमिटेड या संस्थांशी भागीदारी केली आहे.
-बंगळूर येथील ‘न्यूस्पेस रिसर्च अँड टेक्नॉलॉजीज’ने विकसित केलेल्या ड्रोनवर ही प्रणाली बसवून चाचण्या घेण्यात आल्या.

संरक्षणमंत्र्यांकडून अभिनंदन

‘यूएलपीजीएम-व्ही-३’ ही प्रणाली मुख्यत्वे रणगाडे, शत्रूचे ड्रोन, हेलिकॉप्टर आणि इतर हवाई लक्ष्यांचा खात्मा करण्यासाठी विकसित करण्यात आली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या यशाबद्दल ‘डीआरडीओ’, सार्वजनिक क्षेत्रातील संरक्षण कंपन्या आणि खाजगी भागीदारांचे कौतुक केले. भारताच्या धोरणात्मक सुरक्षेच्या दृष्टीने आणि संरक्षण क्षेत्रातील स्वयंपूर्णतेसाठी हा एक ऐतिहासिक टप्पा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com