
भविष्यात जैव अर्थशास्त्राकडे वळावे लागेल - अशोक दलवाई
पुणे : ‘‘औद्योगिक परिवर्तन एक ते चार दरम्यान आपण मोठ्या प्रमाणात पेट्रोलियम पदार्थ, खनिज वस्तूचा वापर केला आहे. आता खनिज पदार्थ वापर बंद करून अपारंपरिक ऊर्जेचा वापर केला पाहिजे. जैव इंधनाचा वापर औद्योगिक क्षेत्रात परदेशात मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. भविष्यात जीवाश्म इंधन आधारित अर्थशास्त्राकडून जैव अर्थशास्त्राकडे वळावे लागेल,’’ असे मत नॅशनल ग्रीन फीड अथॉरिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (आयएएस) अशोक दलवाई यांनी शनिवारी (ता. ७) व्यक्त केले.
‘जितो कनेक्ट २०२२’ मध्ये ते ‘बिझिनेक्सट- ट्रएडिशन टू इनोव्हेशन या विषयवार बोलत होते. ‘घोडावत ग्रुप’चे प्रमुख संजय घोडावत, ‘जीतो अॅपेक्स’चे उपाध्यक्ष विजय भंडारी, ‘महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अॅण्ड ॲग्रीकल्चर’चे ललित गांधी, ‘पुणे व्यापारी महासंघा’चे अध्यक्ष फत्तेचंद रांका, ‘पूना मर्चंट्स चेंबर’चे अध्यक्ष राजेंद्र बाठीया, सचिव महेंद्र पितळीया, अजित सेठिया, प्रवीण चोरबोले, रतन किराड, करुणाकर शेट्टी, अजय बोरा, किशोर ओसवाल, मनोज सारडा आदी यावेळी उपस्थित होते.
दलवाई म्हणाले, नावीन्याची सुरवात झाल्यापासून आपल्या दैनंदिन जीवनात आमूलाग्र बदल झाले आहे. बी-बियाणांच्या बाबतीत होत असलेल्या संशोधनातून शेतीचे स्वरूप बदलले. मात्र हा बदल धीम्या गतीने होता. परंतु विज्ञानाच्या मदतीने आता झपाट्याने बदल होत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून जगात पाचवे औद्योगिक परिवर्तन होत आहे. रोबोटिक्स आज अमलात आले असून उद्योगात त्याचा उपयोग सुरू झाला आहे.
घोडावत म्हणाले, ‘‘दोन लाख रुपये आणि दोन लोकांपासून सुरू केलेला घोडावत ग्रुपचा कारभार दहा हजार कामगारांपर्यंत पोचला आहे. डिजिटल बदलाच्या काळात दर्जात्मक जीवन जगण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. सदैव दुसऱ्यांना मदत करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे.’’
विजय भंडारी म्हणाले, ‘‘काळाप्रमाणे व्यवसायात आपण कोणते बदल केले पाहिजे यावर करण्यात येणारी चर्चा महत्त्वाची आहे. कोरोना काळात व्यवसायाचे स्वरूप बदलले असून आपण डिजिटल युगामुळे दहा वर्षांनी पुढे गेलो आहेत. व्यवसायाचे नवीन स्वरूप आत्मसात करून त्यानुसार पुढील काळात वाटचाल करणे आवश्यक आहे.’’
गांधी म्हणाले, ‘‘भारताची आगामी काळात व्यापार स्थिती कशी राहणार. त्यात कोणते बदल करावे लागतील. कोणत्या आव्हानाचा सामना करावा लागणार. विकासाकरिता कोणते गोष्टी आवश्यक आहे. पारंपरिक व्यवसाय टिकवण्यासाठी कोणती पावले उचलावी लागणार याबाबत चर्चा या परिसंवादात होत आहे. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून त्याप्रमाणे स्वतः मध्ये बदल न केल्यास पारंपरिक व्यवसाय बंद होण्याची भीती आहे.’’ करुणाकर शेट्टी यांनी यावेळी आभार मानले
यशस्वी होण्यासाठी नवनवीन प्रयोग करा : रांका
‘‘नवीन विचार आत्मसात केले तर व्यवसायाच्या नव्या दिशा समजतील. पतंगाप्रमाणे आयुष्यात उंच उडण्याची अभिलाषा ठेवा. अपयशी होण्याच्या भीतीने आपण काही नवीन करत नाही, पण जर यशस्वी व्हायचे असेल तर नवनवीन प्रयोग करावे लागतील,’’ असे रांका म्हणाले.
Web Title: Industrial Transformation In Future We Have To Turn Bio Economics Ashok Dalwai Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..