औद्योगीकरणामुळे मोरांचे दर्शन दुर्मीळ

अनंत काकडे
गुरुवार, 24 जानेवारी 2019

चिखली - तळवडे गायरानात सकाळी फेरफटका मारायला गेल्यावर पालिकेच्या येथील उद्यानासमोरील भिंतीवर बसलेल्या मोरांना पाहून मन प्रसन्न होते असे. या गायरानातील नियोजित डिअर पार्क बारगळल्यानंतर पक्षी उद्यान करावे, अशी मागणी लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी केली. मात्र, महापालिकेने कोणताच निर्णय घेतला नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नागरिकांची घुसखोरी आणि भटक्‍या कुत्र्याच्या त्रासाने येथील मोर, ससे आणि पक्षी गायब झाले आहेत. 

तळवडे येथे ४० हेक्‍टर जागेवर वसलेले गायरान आहे. त्याच्या बाजूला इंद्रायणी नदीचा परिसर, चिखली, देहूरोड, दारूगोळा भांडाराच्या बाजूचे गायरान तसेच चाकण-निघोजे परिसरात शेतीचा पट्टा या वातावरणामुळे येथे मोर, विविध पक्षांचा किलबिलाट व ससे पाहावयास मिळत होते. परिसरात सुमारे ५० ते ६० मोर होते, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. गायरानातील महापालिकेच्या उद्यानासमोरील भिंतीवर सकाळी हमखास मोरांचे दर्शन होत असे. 

दरम्यानच्या काळात झपाट्याने वाढलेल्या औद्योगीकरणामुळे तळवडे गायरानातील मोरांची संख्या घटत गेली. त्यानंतर महापालिकेने या गायरानाचे जतन करण्याच्या दृष्टीने डिअर पार्क प्रकल्प उभारण्याचे ठरविले. मात्र, रेडझोनचे (संरक्षण बाधित क्षेत्र) कारण पुढे करून आता हा प्रकल्प गुंडाळला आहे. मानवी अतिक्रमणांबरोबरच तेथे आता कुत्र्यांचाही वावर वाढला आहे. ते मोर आणि सशांचा पाठलाग करतात. त्यामुळे येथे मोरांचे सहज होणारे दर्शन आता दुर्मीळ झाले आहे. 

याबाबत महापालिका कर्मचाऱ्यांनी बोलण्यास नकार दिला.

पूर्वी इंद्रायणी नदी आणि तळवडे चिखली गायरान परिसरात मोर दिसत होते. मात्र, आता कुत्रे व इतर अतिक्रमणामुळे गायरानात मोर दिसत नाही. संरक्षणखात्याच्या सीमाभिंत आतील गायरानातील मोर बाहेर आले तरच दर्शन होते.
- रविराज भालेकर, नागरिक

डिअर पार्क बारगळल्यानंतर पक्षी उद्यान करण्याची मागणी महापालिकेकडे केली आहे. या गायरानाचा उपयोग करून किमान उद्यान उभारल्यास नागरिकांना त्याचा उपयोग होईल. तसेच पशू, पक्ष्यांचे रक्षण होण्यास मदत होईल.  
- पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, नगरसेवक

Web Title: Industrialization Peacock