पुण्यात ‘उद्योग दिंडी एक्स्पो’चे आयोजन

पुण्यात ‘उद्योग दिंडी एक्स्पो’चे आयोजन
Published on: 

पुणे, ता. २८ ः मराठी उद्योजकांना एकत्र आणण्यासाठी, त्यांच्या व्यवसायाला नवी दिशा देण्यासाठी आणि व्यवसायवाढीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट’च्या पुणे विभागातर्फे ‘उद्योग दिंडी एक्स्पो-२०२६’चे आयोजन केले आहे. ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या तीन दिवसांत कर्वेनगर येथील डी. पी. रस्त्यावरील महालक्ष्मी लॉन्स येथे हा एक्स्पो होणार आहे.
एक्स्पोचे उद्‍घाटन शुक्रवारी (ता. ३०) सकाळी १० वाजता महापौर मंजूषा नागपुरे यांच्या हस्ते होणार आहे. ‘एकमेकां साह्य करू, अवघे होऊ श्रीमंत’ हे ब्रीदवाक्य घेऊन सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट गेली २६ वर्षे मराठी उद्योजकांच्या प्रगतीसाठी कार्यरत आहे. प्रसिद्ध डिझाईन इंजिनिअर कै. माधवराव भिडे यांनी २००० मध्ये स्थापन केलेल्या या संस्थेने मराठी माणसाला उद्योग-व्यवसायात पुढे आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. संस्थेच्या महाराष्ट्रासह सुरत, बडोदा आणि इंदूर येथील एकूण ११६ शाखा असून, ८,६०० हून अधिक उद्योजक या संस्थेशी जोडले गेले आहेत. ‘उद्योजकता, सहकार्य आणि जागतिक संधी’ या संकल्पनेवर आधारित या एक्स्पोच्या माध्यमातून मराठी उद्योजकांना आपली उत्पादने, सेवा सादर करण्याची, इतर व्यावसायिकांशी थेट संपर्क साधण्याची संधी आहे.
सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे अध्यक्ष व कार्यकारी विश्वस्त डॉ. अजित मराठे, विश्वस्त मंडळ आणि सेक्रेटरी जनरल सुहास फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली एक्स्पोचे आयोजन केले आहे. आयोजनात डेप्युटी सेक्रेटरी जनरल महेश इनामदार, रिजन हेड्स विभावरी ब्रम्हणकर, विजय कुलकर्णी, शैलेश नगरकर यांचाही सहभाग आहे. या एक्स्पोला प्रमुख प्रायोजक म्हणून बिझनेस कोच डॉ. सोमनाथ शिंगारे, तर सहप्रायोजक म्हणून पितांबरी इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट्स यांचे सहकार्य लाभले. या एक्स्पोला पुणेकरांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले.

क्षेत्रांतील उद्योजकांचा सहभाग
या एक्स्पोत उत्पादन, सेवा, बांधकाम, शेती, आर्थिक सल्ला, विमा, खाद्यपदार्थ, स्टार्टअप्स अशा विविध क्षेत्रांतील उद्योजकांचा सहभाग असेल. तसेच, नामवंत उद्योजकांचे अनुभव, व्यवसायवाढीसाठी मार्गदर्शन आणि व्यावसायिक संपर्क वाढवण्याच्या संधी असणार आहेत. एक्स्पोतील ‘रिडेव्हलपमेंट लाऊंज’मध्ये जुन्या गृहनिर्माण सोसायट्यांच्या पुनर्विकासाबाबत सविस्तर मार्गदर्शन आणि मोफत सल्ला मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com