कातकरी मुलाच्या उपचारासाठी एकवटले गाव

मीनानाथ पानसरे
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

पाडळी (ता. जुन्नर) येथील कातकरी समाजाच्या विद्यार्थ्याला कर्करोगाचे निदान झाले. सैरभैर झालेल्या या विद्यार्थ्याच्या कुटुंबाच्या मदतीसाठी सरपंच, सदस्य व ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. विद्यार्थ्याला उपचारासाठी डॉ. डी. वाय.पाटील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

आपटाळे (पुणे) : पाडळी (ता. जुन्नर) येथील कातकरी समाजाच्या विद्यार्थ्याला कर्करोगाचे निदान झाले. सैरभैर झालेल्या या विद्यार्थ्याच्या कुटुंबाच्या मदतीसाठी सरपंच, सदस्य व ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. विद्यार्थ्याला उपचारासाठी डॉ. डी. वाय.पाटील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

पाडळी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात सरपंच संतोष केदारी यांची आरोग्यविषयक बैठक सुरू असतानाच या वस्तीतील एक आजी आपल्या नातवाच्या आजाराची कागदपत्रे घेऊन आली. केदारी यांनी ती कागदपत्रे पाहिल्यानंतर धीरज धोंडू हिलम याला कर्करोगाची गाठ असल्याचे समजले. धीरज हा नऊ वर्षांचा असून चौथी इयत्तेत शिक्षण घेत आहे. तातडीने या गरीब व गरजू विद्यार्थ्याला मदत करण्याची पावले उचलत ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या मदतीने केदारी यांनी धीरज, त्याची आई व आजी यांना घेऊन डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयातील वरिष्ठांना भेटून धीरजच्या घरच्या परिस्थितीची माहिती दिली.

मोलमजुरी करत कुटुंबाचा गाडा ओढणाऱ्या धीरजच्या आई, वडील व आजी यांच्या परिस्थितीबाबत हॉस्पिटलच्या प्रशासनाने देखील संवेदनशीलता दाखवित मोफत उपचार करण्याचे आश्वासन दिले. दररोजचे जेवण अन्‌ किरकोळ खर्चासाठी सरपंच संतोष केदारी, उपसरपंच अरुण पापडे, भूषण कबाडी, आरोग्य सेविका नागूताई खराडे यांच्यासह ग्रामस्थांनी मदत केली. धीरजवर उपचार सुरू करण्यात आले असून त्याच्या शरीरावरील गाठ नेमकी कशाची आहे? याची तपासणी करून पुढील उपचार करण्यात येणार आहेत.

पाडळी गावातील प्रत्येक नागरिकांच्या कठीण प्रसंगी सदैव मदतीचा हात देण्यासाठीच खऱ्या अर्थाने ग्रामस्थांनी मला लोकनियुक्त सरपंच केले आहे. केवळ पद भूषविणे हे महत्त्वाचे नसून गावचे पालकत्व स्वीकारल्यानंतर जबाबदारी देखील पूर्ण करणे गरजेचे आहे. धीरज हिलम याच्यावर पूर्ण उपचार करून त्याला यापुढील काळातही आधार देणार आहे.
- संतोष केदारी, सरपंच, पाडळी बारव

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Initiative For Treatment Of A Boy Suffering From Cancer