esakal | 'भाजपच्या काळात जलयुक्त शिवार योजनेतून झालेल्या निकृष्ट कामांची चौकशी करावी' 
sakal

बोलून बातमी शोधा

'भाजपच्या काळात जलयुक्त शिवार योजनेतून झालेल्या निकृष्ट कामांची चौकशी करावी' 

राज्यातील मागील भाजपच्या सरकारने जलयुक्त शिवार योजनेचा गवगवा करत ओढयावरील बंधारे, छोटे तलाव, ओढे व तलाव खोलीकरणाच्या कामांसाठी कोटयावधी रूपयांचे निधी उपलब्ध करून दिला होता.

'भाजपच्या काळात जलयुक्त शिवार योजनेतून झालेल्या निकृष्ट कामांची चौकशी करावी' 

sakal_logo
By
सावता नवले

कुरकुंभ : दौंड तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेतून अनेक गावांमध्ये झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे तलाव, ओढयावरील बंधारे फुटून पुरामुळे शेती, पिके व पूल वाहून गेल्याने शेतकऱ्यांबरोबरच सरकारच्या कोटयवधी रूपयांच्या नुकसानीला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्यातील मागील भाजपच्या सरकारने जलयुक्त शिवार योजनेचा गवगवा करत ओढयावरील बंधारे, छोटे तलाव, ओढे व तलाव खोलीकरणाच्या कामांसाठी कोटयावधी रूपयांचे निधी उपलब्ध करून दिला होता. तसेच तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांकडून बळजबरीने सीएसआर फंडाच्या माध्यमातून लाखो रूपये निधी गोळा केला. हा निधी पदाधिकारी, ठेकेदार, संबंधित विभागांचे अधिकाऱ्यांच्या सोयीनुसार व फायद्यासाठी खर्च करण्यात आला. त्यामुळे अनेक गावांमध्ये अधिक नफा कमविण्यासाठी निकृष्ट दर्जाची कामे केली. हीच निकृष्ट दर्जाची कामे यंदा पावसाळ्यात जनता व सरकारच्या नुकसानीचे कारण बनली आहेत. मळद येथील निकृष्ट दर्जाचा फुटलेला तलाव त्याचेच उदाहरण आहे.

दरम्यान, तलाव फुटून आलेल्या पुरामुळे, मळद, रावणगाव, नंदादेवी, खडकी, स्वामी चिंचोली येथील ओढयावरील बंधारे फुटले. लगतच शेती, पिकांचे नुकसान झाले. रस्ते, पूल वाहून गेल्याने दळणवळणाची गैरसोय होत आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांकडून संताप व्यक्त होत आहे. अशा कामांच्या तक्रारीनंतर सरकारने जलयुक्त शिवार योजनेत झालेल्या अपहार व निकृष्ट कामांच्या चौकशीसाठी एसआयटीकडून चौकशी होणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दौंड तालुक्यात झालेल्या जलयुक्त शिवार योजनेतून व सीएसआर फंडातून झालेल्या कोटयवधी रूपयांच्या कामांची चौकशी करावी. दोषी ठेकेदार व अधिकाऱ्यांविरूध जबाबदारी निश्चित फौजदारी गुन्हे दाखल केले तरच निकृष्ट कामांना आळा बसून निधीचा योग्य वापर होऊ शकेल.

राजकीय वरहस्तामुळे दौंड तालुक्यात जलयुक्त शिवार योजना व विविध योजनांच्या माध्यमातून झालेली रस्त्याची कामे ठेकेदार जगविण्याची व निधी जिरविण्याची रोजगार हमी योजना बनली आहे. या कामांची चौकशी करून कारवाई होईपर्यंत शासनाकडे पाठपुरावा करणार आहे.-वासुदेव काळे, प्रदेश सरचिटणीस भाजप किसान मोर्चा.

जलयुक्त शिवार योजनेतून व जिल्हा परिषदेच्या छोटे पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून झालेल्या निकृष्ट कामांची चौकशीची मागणी यापूर्वी परीषदेच्या सर्वसाधारण सभेत केली असून, येणाऱ्या सभेतही केली जाईल. मळद येथील फुटलेल्या तलावाच्या कामाची माहिती मिळावी म्हणून संबंधित विभागाला लेखीपत्र दिले आहे. -वीरधवल जगदाळे, जिल्हा परिषद व नियोजन मंडळ सदस्य पुणे. 

(संपादन : सागर डी. शेलार)

loading image