पुणे जिल्ह्यातील 'या' गावात भेट देणारे नवल किशोर राम ठरले पहिले जिल्हाधिकारी

टीम ई सकाळ
शनिवार, 27 जून 2020

- धरणग्रस्तांना आरोग्य सुविधा देण्याचे दिले आश्वासन

खडकवासला (पुणे) : रायगड जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या वेल्हे तालुक्यातील दुर्गम दऱ्या-खोऱ्यात वसलेल्या घोल-दापसरे येथे निसर्गचक्री वादळाचा तडाखा बसला होता. तसेच, दुर्गम भागात आरोग्य सुविधा व अन्य मूलभूत सुविधांची जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पाहणी केली. ते या गावात पोहोचणारे पहिले जिल्हाधिकारी ठरले आहेत. 

घोल-दापसरे हे पुण्यापासून सुमारे 75 ते 80 किलोमीटर आहे. पानशेत धरणाचा पाणीसाठा संपल्यावर तेथून हे गाव आहे. या गावात जाऊन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी स्थानिक नागरिकांच्या समस्या समजून घेतल्या. तसेच, नागरिकांना हक्काची आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी ग्रामस्थांना सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

यावेळी आमदार संग्राम थोपटे, जिल्हा पोलिस अधिक्षक संदीप पाटील, भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार शिवाजी शिंदे,
 सभापती दिनकर सरपाले, जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे, दिनकर धरपाले, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अंबादास देवकर, वेल्ह्याचे सहायक पोलिस निरिक्षक विनायक देवकर उपस्थित होते.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अतिशय दुर्गम ठिकाणी वसलेल्या घोल गावाची जिल्हाधिकाऱ्यांनी तसेच, पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांनी पाहणी केली. या गावातील वैद्यकीय सुविधा, रस्ते, विद्युत पुरवठा, दूरसंचार सेवा अशा मुलभूत सुविधांच्या अडचणींबाबत ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी सरपंच कोंडीराम मोरे यांनी गावातील समस्यांबाबत व निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत माहिती दिली. घोलच्या अडचणी प्राधान्याने सोडविणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. यावेळी घोल प्रशासनातील विविध विभागांचे प्रमुख तसेच, ग्रामस्थ उपस्थित होते. घोल येथे चक्रीवादळाने घरांचे तसेच इतर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच, दुर्गम भागात मुलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. 

आरोग्य सुविधा सुधारणार

पानशेत धरणातील दुर्गम दऱ्या खोऱ्यात आरोग्य सुविधा वेळेवर उपलब्ध होत नाही. त्यासाठी कायमस्वरूपी सुविधा करून देण्यासाठी प्राधान्य देणार आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिले. आमदार संग्राम थोपटे यांनी दुर्गम खेड्यात आशा वर्कर नियुक्त कराव्यात. त्यांना पुरेसे मानधन द्यावे. आरोग्य सेवेसाठी रुग्णवाहिका आदी बाबींची गरज आहे. या परिसरातून रायगड जिल्ह्यात जाण्यासाठी रस्ता करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inspection of District Collector Naval Kishore Ram at Ghol-Dapsare