...अन्‌ परिस्थितीच बनली ताकद

प्रशांत विनायक करंडे
Thursday, 14 March 2019

रांजणीतील नरसिंह विद्यालयात पाचवीत प्रवेश घेतल्यानंतर क्रीडाशिक्षक संदीप चव्हाण यांनी तिला आवड असलेल्या क्षेत्रात काम करण्याची संधी दिली. परिस्थिती बेताची असल्याने व्याख्यानांसाठी बाहेरगावी जाण्यास त्यांनीच सहकार्य केले.

रांजणीतील नरसिंह विद्यालयात पाचवीत प्रवेश घेतल्यानंतर क्रीडाशिक्षक संदीप चव्हाण यांनी तिला आवड असलेल्या क्षेत्रात काम करण्याची संधी दिली. परिस्थिती बेताची असल्याने व्याख्यानांसाठी बाहेरगावी जाण्यास त्यांनीच सहकार्य केले.

लहानपणापासून समाजकार्याची आवड असलेल्या अर्चनाची घरची परिस्थिती नाजूक होती. कमजोर परिस्थिती हीच तिची खऱ्या अर्थाने एक ताकद बनली. त्यानंतर तिने मागे वळून न पाहता खडतर प्रवाहातून यशस्वी झेप घेतली. वयाच्या २५ व्या वर्षी अर्चना भोर ही शेतकरी असलेले करंडे कुटुंबीयांची सूनबाई झाली. सासरच्या मिळालेल्या भक्कम साथीमुळे ती आज राज्यभर प्रबोधनात्मक व्याख्यानं देत आहे.

रांजणी (ता. आंबेगाव) शेतकरी कुटुंबातील अर्चनाच्या घरची आर्थिक परिस्थिती खूपच नाजूक होती. तिच्यासह एकूण पाच भावंडे, त्यात सर्वांत लहान अर्चना. भावंडामध्ये शेवटी मुलगी जन्मास आल्याने कुटुंबात ती सर्वांचीच नावडती. आई निरक्षर वडील व्यसनी मात्र त्या वेळी तिचे चुलते आनंदा भोर यांनी तिला साथ दिली. वडिलांची शाबासकीची थाप मिळवण्यासाठी काही तरी बनून दाखवण्याचे अर्चनाने त्यावेळी ठरविले. तशी तिला लहानपणापासूनच समाजकार्याची आवड होती. रांजणीतील नरसिंह विद्यालयात पाचवीत प्रवेश घेतल्यानंतर क्रीडाशिक्षक संदीप चव्हाण यांनी तिला आवड असलेल्या क्षेत्रात काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली.

अर्चनाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तिच्याजवळ प्रवासासाठी सुद्धा पैसे नव्हते. त्या वेळी तिला व्याख्यानासाठी तिचे गुरू संदीप चव्हाण हे पुणे, बारामती, मंचर, नारायणगाव, हडपसर येथे घेऊन जायचे. त्या वेळी चव्हाण सर म्हणायचे, ‘‘जाण्याच्या प्रवासाला पैसे आहेत परंतु घरी परतण्यासाठी तुम्हाला ही स्पर्धा जिंकावीच लागेल’’ त्यामुळे जिंकण्याची जिद्द निर्माण झाली. अर्चनाला चव्हाणसरांसारखे द्रोणाचार्य लाभल्याने अशा परिस्थितीत उभी राहण्याची जिद्द निर्माण झाल्याने परिस्थिती तिची ताकद बनली. त्यानंतर तिने वडिलांना नवीन घराची उभारणी करून दिली.

वयाच्या अकराव्या वर्षापासून तिने शालेय व्याख्यान, प्रबोधनात्मक कार्यक्रम करण्यास सुरवात केली. शालेय शिक्षण घेता-घेता मिळेल त्याप्रमाणे व्याख्यान करत होती. रांजणी येथे तिने नववीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर परिस्थितीमुळे तिने बाहेरून शिक्षण घेण्याचे ठरवले. दहावी ते बारावीचे शिक्षण नेवासाफाटा (जि. नगर) येथे तिने पूर्ण केले. त्यावेळी खेळाचीही आवड असल्याने धनुर्विद्देत तिने महाराष्ट्र संघाकडून खेळताना एका सुवर्णपदकासह एकूण तीन पदके पटकावली. बारावीनंतर डिप्लोमा, डीग्रीचे शिक्षण पूर्ण केले. त्या वेळी अभिजित दळवी व शुभांगी दळवी या दोन शिक्षकांची भक्कम साथ लाभली. तेव्हापासून आजही साथ मिळत आहे.

तसेच अर्चनाच्या जडणघडणीत अनिल गुंजाळ यांचा खारीचा वाटा होता.
गेल्या तीन वर्षात तिने मागे वळून पाहिलेच नाही. तिने महाराष्ट्रभर प्रबोधन व्याख्याने केली. त्यामध्ये जिजाऊ सांगे शिवबाला, गरज जिजाऊंच्या संस्कारांची अन्‌ छत्रपतींच्या विचारांची या विषयांसह महिलांच्या विषयांचा समावेश आहे. सामाजिक कार्याबद्दल तिला अनेक सामाजिक पुरस्कारांनी गौरवण्यात आले. सिंधूताई सपकाळ यांच्या संस्थेसह विविध अनाथ मुलांना विविध वस्तू वाटून तिने आपला प्रत्येक आनंद साजरा केला. सिंधुताईंची भेट घेऊन त्यांच्याप्रमाणे अनाथांची माय होण्याचे तिचे स्वप्न आहे. २०१७ साली अर्चनाचा विवाह आंबेगाव तालुक्‍यातीलच काठापूर ब्रुद्रुक येथील प्रशांत विनायक करंडे यांच्या सोबत झाला. पतीबरोबर सासरे विनायक करंडे व रामदास करंडे (संस्थापक, स्वप्नील सामाजिक फाउंडेशन) यांच्या मिळालेली भक्कम साथ यामुळे व्याख्यान प्रबोधनाचा दौरा वाढतच गेला. मागील वर्षी गरोदरपणात सुद्धा सातव्या महिन्यांपर्यंत महाराष्ट्रभर शिवाजीराजे, जिजाऊंची व्याख्याने करण्याचे काम अर्चनाने केले. तिच्या या कार्याला खूप खूप सलाम...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inspirational story of Archana Bhor Karande on the occasion of womens day