कुटुंबीयांच्या पाठिंब्यामुळे यशस्वी

Mahananda-Valse-Patil
Mahananda-Valse-Patil

गार्गी ॲड सेंटर, महानंदा आइस फॅक्‍टरी, समर्थ आईस फॅक्‍टरी, श्री समर्थ सप्लायर, विश्वव्हिजन या पाच कंपन्यांच्या माध्यमातून जवळपास वीस जणांना हक्काचा रोजगार मिळाला आहे. नोकरी करायची नाही, तर नोकऱ्या निर्माण करायच्या. या वाटचालीचा निश्‍चितच मला आनंद वाटतो.

ता. १ ऑगस्ट १९९१ रोजी महानंदा बाळासाहेब बोऱ्हाडेची महानंदा दिलीप वळसे पाटील झाली. मुंबईत संपूर्ण आयुष्य गेले. त्यामुळे निरगुडसर (ता. आंबेगाव) सारख्या खेडेगावात ही मुलगी राहणारच नाही, अशी चर्चा लग्नाचे विधीप्रसंगी सुरू होती. 

लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी आले. पप्पांनी मला निक्षून सांगितले, ‘आनंदाने माहेरी आलीस, तर वर्षभर ठेवून घेईन, भांडून आलीस तर त्याच पावली परत सोडून येईल’ तेव्हाच समजले की आता आपण खंबीरपणे येईल त्या प्रसंगाला तोंड द्यायचे. निरगुडसरच्या घरात सुधारणा करायला सुरवात केली. या सुधारणांसाठी घरच्यांनी पूर्ण साथ दिली. 

मी नोकरी करावी, असे सर्व जण म्हणत होते. पण, मी विरोधात होते. कारण नोकरी करणाऱ्या महिलांची परवड व धावपळ मी लहानपणापासून मुंबई व ठाणे शहरात पाहत होते. स्वतःचा व्यवसाय असावा. त्या माध्यमातून अनेकांना रोजगार देता यावा, अशी मनापासून इच्छा होती. ‘उत्पादित मालासाठी बाजारपेठ शोधणार नाही, तर बाजारपेठ स्वतः माझ्याकडे आली पाहिजे,’ अशी अपेक्षा होती. त्यानुसार आंबेगाव तालुक्‍यात कोणत्या व्यवसायाची गरज आहे. यासंदर्भात चाचपणी सुरू केली. दूध व्यवसाय वाढीस लागला होता. पण, दूध थंड राहण्यासाठी पुण्याहून बर्फ येथे आणावा लागत होता. 

‘आइस फॅक्‍टरी’ची गरज जास्त आहे. याची जाणीव झाली.  त्यादृष्टीने बॅंकेशी संपर्क साधून कर्ज प्रकरण मंजूरही केले. आवश्‍यक त्या विविध सरकारी परवानग्या घेतल्या. ‘महानंदा आइस फॅक्‍टरी’चा भूमिपूजन समारंभ केला. चार महिन्यांत फॅक्‍टरी सुरू झाली. गार्गी लहान. निरगुडसर ते गायमुख असा रोज प्रवास करणे मला शक्‍य नव्हते. त्यामुळे म्हणावे असे सुरवातीला व्यवसायाकडे लक्ष देता येत नव्हते. गार्गी मोठी झाली. परत तिच्या इंग्लिश माध्यमाच्या स्कूलचा प्रश्‍न समोर आला. त्या वेळी आंबेगाव तालुक्‍यात इंग्लिश मीडियम स्कूल नव्हती. गार्गीला निरगुडसर ते नारायणगाव असा प्रवास लांब पडणार होता. त्यामुळे गायमुखला (अवसरी खुर्द) राहण्यासाठी आले. त्यानंतर खऱ्या अर्थाने माझ्या व्यावसायिक  कारकिर्दीला सुरवात झाली. अनेकदा निर्णय हे चुकायचे, नुकसान व्हायचे. पण, काही निर्णय बरोबर असायचे. तालुक्‍यात दिवसेंदिवस दुधाचे उत्पादन वाढू लागले. फॅंक्‍टरीतील बर्फपुरवठा कमी पडू लागल्याने समर्थ आइस फॅक्‍टरीची उभारणी केली. यशलचा जन्म झाला. दोघींना जगातील स्पर्धेमध्ये टिकायचे असेल, तर त्यांना दर्जेदार इंग्रजी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. या उद्देशाने मुली पुण्यातील मुलींसाठी असलेल्या हॉस्टेलमध्ये ठेवल्या. 

यशल काजूप्रक्रिया उद्योग सुरू केला. कच्च्या मालासाठी कोकण पिंजून काढला. अगदी सात समुद्रापार असलेल्या नायजेरियावरून कच्चा माल आयात केला. १० वर्षे यशस्वीरीत्या व्यवसाय केला. तिसरा प्रकल्प ‘गुरुकृपा पेपर’ द्रोण व्यवसाय उभा केला. दरम्यानच्या कालावधीत सन १९९६-९७ चा राज्य शासनाने उत्कृष्ट महिला उद्योजिका पुरस्कार देऊन सन्मानित केले. 
हे सर्व करीत असताना मुलींच्या शिक्षणाकडे व्यवस्थित लक्ष दिले. गार्गी डबल ग्रॅज्युएट झाली असून, तिनेही सौरऊर्जेचा व्यवसाय सुरू केला आहे.

वडिलांनाही तिची चांगली मदत मिळते. ‘यशल’चे आर्किटेक्‍टचे शिक्षण चालू आहे. ‘ती चा ठसा’ या पुस्तकाची कल्पना ‘गार्गी’ची आहे. त्यामुळे कर्तृत्ववान महिलांची माहिती लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी मदत झाली. असे म्हणतात की यशस्वी पुरुषाच्या मागे त्याच्या पाठीशी पत्नी/ आई असते. पण, माझ्या बाबतीत सर्व उलट आहे. हे सर्व करीत असताना माझ्या पाठीशी माझे पती ‘सकाळ’चे पत्रकार दिलीप काशिनाथ वळसे पाटील हे खंबीरपणे उभे आहेत. याचा मला सार्थ अभिमान आहे. 

गार्गी ॲड सेंटर, महानंदा आइस फॅक्‍टरी, समर्थ आईस फॅक्‍टरी, श्री समर्थ सप्लायर, विश्वव्हिजन या पाच कंपन्यांच्या माध्यमातून जवळपास वीस जणांना हक्काचा रोजगार मिळाला आहे. हा मनस्वी आनंद आहे. लग्नानंतर ठरविले होते. नोकरी करायची नाही, तर नोकऱ्या निर्माण करायच्या. त्यानुसार केलेल्या वाटचालीचा निश्‍चितच मला आनंद वाटतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com