रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा

नंदिनी मोहन साळी
गुरुवार, 14 मार्च 2019

साळी मेडिकल फाउंडेशनच्या माध्यमातून एक ट्रस्टी म्हणून आदिवासी भागात शिबिरांद्वारे महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. शाळा, अनाथ आश्रमातील विद्यार्थी, अपंग, मतिमंद मुलांकरिता आरोग्य शिबिरे घेतली.

साळी मेडिकल फाउंडेशनच्या माध्यमातून एक ट्रस्टी म्हणून आदिवासी भागात शिबिरांद्वारे महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. शाळा, अनाथ आश्रमातील विद्यार्थी, अपंग, मतिमंद मुलांकरिता आरोग्य शिबिरे घेतली.

प्रत्येकाच्या आयुष्यात एक टर्निंग पॉइंट असतो. सन १९७९ मध्ये मंचर येथील डॉ. मोहन श्रीकृष्ण साळी यांच्याशी विवाह करून मी मंचरला आले. हाच माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट.

चाळीस वर्षा पूर्वीचा काळ फारच बिकट होता. मी सांगली शहरातून मंचर सारख्या खेडेगावात आले. छोटे गाव आर्थिक परिस्थिती नाजूक. एकत्र कुटुंब. सासू सासरे प्राथमिक शिक्षक. व्यवसायाची सुरवात नव्हती. पण आई वडिलांच्या कडक व चांगल्या शिस्तीमुळे परिस्थितीचे भान ठेवून जुळवून घेतले. सुरवातीला भाड्याच्या खोलीमध्ये कसल्याही प्रकारची वैद्यकीय उपकरणे नसतानाही कन्सल्टिंग सुरू केले. त्यानंतर भाड्याच्या जागेत साळी हॉस्पिटल झाले. 

प्रॅक्‍टिस करताना भूलतज्ज्ञ, असिस्टंट, ब्लड बॅंक, पुरेसा स्टाफ इत्यादी सुविधा नसताना व आर्थिक परिस्थिती नाजूक असतानाही हॉस्पिटल सुरू केले. डॉक्‍टरांची जिद्द, प्रामाणिकपणा व चिकाटी बघून व्याप वाढत गेला.

केवळ परिस्थितीशी निकड म्हणून मेडिकलशी काहीही सबंध नसताना इंजेक्‍शनला घाबरणारी मी या परिस्थितीत थोडा खारीचा वाटा उचलावा म्हणून हॉस्पिटल मॅनेजमेंट व ऑपरेशन असिस्टंटचा अभ्यास केला. गेली चाळीस वर्ष फर्स्ट असिस्टंट म्हणून काम करत आहे. एक प्रसंग असा आला की पेशंटच्या गरजेपोटी स्वतः च्या डिलिव्हरीच्या दुसऱ्या दिवशी रात्री दोन वाजता सिझेरीयन शस्त्रक्रिया करताना मदतीला गेले. हा प्रसंग मागे वळून पाहताना आनंद होतो. आयुष्याच्या या टप्प्यावर पतीची साथ व सासू सासऱ्यांचा पाठिंबा महत्त्वाचा वाटतो. जस जसे अनुभव येत गेले तसे पुढे जात राहिले. साळी मेडिकलच्या फाउंडेशनच्या माध्यमातून एक ट्रस्टी म्हणून आदिवासी भागात शिबिराद्वारे महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. हॉस्पिटलच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या कामाची आवड म्हणून नेत्रा शहा यांच्या मार्गदर्शना खाली इनरव्हितक्‍लबमध्ये प्रवेश केला. प्रेसिडेंट म्हणून काम केले. त्या माध्यमातून शाळा, अनाथ आश्रम, अपंग, मतिमंद मुलांकरिता आरोग्य शिबिरे घेतली व हॉस्पिटलमध्ये कर्करोग निदान शिबिर घेतले. त्यांच्यावर योग्य पद्धतीने उपचार झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून मिळालेला आनंदाचा क्षण सर्वोच्च होता. त्यातूनही चांगलाच अनुभव आला. त्यावेळी किचन मध्ये स्वयंपाकाला बाई ठेवणे. तिच्या हातचे खाणे म्हणजे दुर्मिळच. आणि परवडणारेही नव्हते. माझ्या रेसिपीच्या क्‍लासच्या अनुभवातून व्यवसायाचा व्याप सांभाळून किचनचा व्याप सांभाळला. त्या आवडीतून झी मराठी चॅनेलवर प्रसिद्ध अभिनेता प्रशांत दामले बरोबर एपिसोड झाला. माझ्या अन्नपूर्णतेचा प्रसाद मिळाला.

यामध्ये माझी मैत्रीण लीला मोरे यांचा मोठा वाटा आहे. आता दोन्ही मुले, दोन्ही सुना डॉक्‍टर आहेत. मोठा मुलगा डॉ. भूषण याने मंचरमध्ये पन्नास बेडचे गेटवेल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केले आहे. त्याची पत्नी डॉ. सौ दीप्ती ही देखील स्त्री रोग तज्ज्ञ असून त्याला मदत करते. दुसरा मुलगा गौरव युरो सर्जरी मध्ये सुपर स्पेशालिस्ट आहे. व त्याची पत्नी डॉ. सौ. मैथिली ही स्टेमसेल स्पेशालिस्ट आहे. त्यामुळे एकाच छताखाली रुग्णांना सर्व प्रकारच्या अत्याधुनिक आरोग्य सुविधा मिळतात. रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना पुण्याला ये जा करण्याची गरज भासत नाही. दुसरा मुलगा गौरव युरो सुपर स्पेशालिस्ट म्हणून यशाकडे वाटचाल करत आहे.

आयुष्याच्या ह्या टप्प्यावर दोघांचीही साथ आहे. पती डॉ. मोहन साळी यांनी अतिशय खडतर प्रवास करून आंबेगाव, खेड, जुन्नर भागातील रुग्णांना दिलेली आरोग्य सेवा सर्वांच्या कायमस्वरूपी स्मरणात राहणारी आहे. हा आनंद जीवनातील सर्वोच्च आहे. माझ्या पडद्यामागच्या भूमिकेला समाजासमोर मांडण्याची संधी ‘ती’चा ठसा या पुस्तकाच्या निमित्ताने मिळाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inspirational story of Nandini Sali on the occasion of womens day