व्यवसाय सांभाळत मुलींना दिला रोजगार

Smita-Raikar
Smita-Raikar

पार्लर चालवीत असतानाच परिसरातील मुलींना आवड म्हणून आणि त्यांना आर्थिक विवंचनेतून सुटण्यासाठी मी मोफत ब्युटी पार्लरचे ट्रेनिंग दिले. शिवणकामाबरोबरच भरतकामही शिकवले. यामुळे गरीब घरातील मुलीही स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकल्या.

विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरालगत एका बाजूला असलेले फुरसुंगी हे माझे माहेर. तर दुसऱ्या बाजूला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या संजीवन समाधीने पावन झालेल्या आळंदीत सासर आहे. दोन्ही ठिकाणी वास्तव्य झाल्याने खऱ्या अर्थाने माझा फायदाच झाला. दोन्ही कुटुंब साधी आणि शिक्षित असल्याने माझ्या अंगभूत कलागुणांना लहानपणापासून मिळालेली चालना लग्नानंतरही सासरच्या मंडळींनी पुढे सुरूच ठेवली. निव्वळ राजकारण नाही, तर समाजातील शेवटच्या माणसापर्यंत संबंध टिकवून ठेवायचे हा माझा स्थायी स्वभाव. खोटेपणाची चीड आणि सत्यासाठी आग्रह असल्याने कायमच स्पष्टपणे माझ्या वागण्यात राहिला. यामुळे माझ्यावर इतरांची नाराजी ओढवली, पण जिवाला जीव देणाऱ्या मैत्रिणी आणि हितचिंतकही मोठ्या प्रमाणात मला मिळाले. माझा समाजकारणाचा वसा मी माझ्या स्पष्ट स्वभावामुळे आणि समाजातील जनमानसातील ऋणानुबंधामुळे आजही कायम टिकून ठेवला. 

माझे आजोबा रघुनाथ म्हस्कू मोरे वीस वर्षे गावचे सरपंच होते. चुलते अशोक मोरे हवेली पंचायत समितीचे माजी सभापती होते. यामुळे माहेरी आजोबा आणि चुलत्यांचा राजकीय वारसा होताच. लग्नानंतर आळंदी देवाची येथे आल्यावर माझे पती ज्ञानेश्वर रायकर हे आळंदी नगर परिषदेत नगरसेवक होते. यामुळे मला सासरी आल्यावर राजकीय वारसा आपोआप मिळाला.

राजकारण न करता समाजकारण करून बरोबर असलेल्यांचा उद्धार व्हावा, यासाठी फक्त तळमळीनेचे काम करणे हाच एकमेव उद्देश आम्हा पतिपत्नीचा आहे. आमच्या मितभाषी स्वभावामुळे लोकांच्या मनात कायम आम्ही दोघेही घर करून राहिलो. लोकांशी सततच्या संपर्कामुळे जनमानसात टिकून राहणे जमले. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या नगरपालिका निवडणुकीत मी मोठ्या मताधिक्‍क्‍याने निवडून आले. सर्व पक्षातील लोकांशी, कार्यकर्त्यांशी आणि नेत्यांशी असलेल्या सलोख्याच्या संयमामुळे मला राजकारण आणि समाजकारण करताना नेहमीच फायदा झाला. महिलांच्या समस्या मग त्या कौटुंबिक असो वा सामाजिक, त्या सोडविण्याची आवड असल्याने सातत्याने पुढाकार घेऊन त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला. 

चार वर्षांपूर्वी राजेश्वरी महिला बचत गट, तुळजा भवानी महिला बचत गट आणि शिवेश्वरी महिला बचत गटाच्या माध्यमातून कष्टकरी महिलांना एकत्र करून आर्थिक आधार देण्याचे काम केले. आळंदीत रोजगाराचे साधन आहे. मात्र आपल्या तुटपुंज्या रोजगारातून आपल्या स्वतःच्या कुटुंबासाठी महिलांना बचतीची आवड निर्माण व्हावी म्हणून बचत गटाच्या माध्यमातून मार्गदर्शन आणि बचतीची सवय लावण्याचे काम केले. 

माझा स्वतःचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय आळंदीत आहे. पार्लर चालवीत असतानाच परिसरातील मुलींना आवड म्हणून आणि त्यांना आर्थिक विवंचनेतून सुटण्यासाठी मी मोफत ब्युटी पार्लरचे ट्रेनिंग दिले.

शिवणकामाबरोबरच भरतकामही शिकवले. यामुळे गरीब घरातील मुलीही स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकल्या. कमी भांडवलात स्वतःचा व्यवसाय घरच्या घरी करू लागल्या. निव्वळ कौटुंबिक समस्या नाही तर महिलांचे जीवन सुसह्य व्हावे. महिला सबलीकरण व सक्षमीकरण व्हावे यासाठी व्याखाने, शिबिरे आयोजित केली. हिमोग्लोबिन तपासणी, फिजिओथेरपी यासाठी स्थानिक वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकांना बरोबर घेत वेळोवेळी शिबिरे घेतली. महिलांना एकत्र येण्यासाठी एकत्रित व्यासपीठ मिळवून देत हळदीकुंकूसारखे समारंभ आयोजित केले. यामुळे महिलांना एकमेकांशी मनमोकळ्या गप्पा मारून एकमेकांची सुखदु:खावर संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली. 

लहानपणापासून मला वक्तृत्वाची आवड असल्याने निर्भीड स्वभावाची म्हणून ओळख होती. यामुळे नगरसेवक झाल्यानंतरही मी नागरिकांच्या समस्या तेवढ्याच पोटतिडकीने मांडते. सामाजिक कार्याचा सासरचा आणि माहेरचा वसा मी जोपासला. मागे बघायचे नाही आणि पुढे चालत राहायचे या स्वभावामुळे आज मला यश मिळाले. लोकांचे प्रश्न सुटले की मला आणि माझ्याबरोबरच्या लोकांना विलक्षण आनंद मिळतो. घर प्रापंचिक जबाबदारी सांभाळून हे सर्व केले. माझ्या सामाजिक कार्याला झळाळी देणाऱ्या माझ्या कुटुंबातील सदस्य, जाऊबाई हेमलता रायकर व उषाताई रायकर, माझा भाऊ आणि जिवश्‍च कंठस्य अशा मैत्रीणी आणि हितचिंतक यांचा माझ्याशी असलेल्या ऋणानुबंधामुळे माझे काम सदैव असेच पुढे राहणार याची मला खात्री आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com