लोकसेवेसाठी जोशी भोजनालय

सोनलभाभी जनकशेठ जोशी
शुक्रवार, 15 मार्च 2019

स्वतःची जागा नसल्याने छोट्या-छोट्या धर्मशाळा भाड्याने घेऊन लग्न लावू लागले. लग्नामध्ये जेवणाचे काम मिळत गेल्याने आर्थिक कमाईही चांगली होऊ लागली. आता आमच्या जोशी मंगल कार्यालयात मोठी लग्ने होतात.

स्वतःची जागा नसल्याने छोट्या-छोट्या धर्मशाळा भाड्याने घेऊन लग्न लावू लागले. लग्नामध्ये जेवणाचे काम मिळत गेल्याने आर्थिक कमाईही चांगली होऊ लागली. आता आमच्या जोशी मंगल कार्यालयात मोठी लग्ने होतात.

कुटुंबाला हातभार म्हणून सुरवातीला मी भोजनालय सुरू केले. माउलींच्या मंदिराजवळ घर असल्याने भोजनालय चांगले चालले. नंतर हळूहळू छोटी लग्ने लावण्यास सुरवात केली. जम बसू लागल्यावर पाचशेपेक्षा अधिक वऱ्हाडीच्या लग्नांना सुरवात केली. आणि आज आम्ही सगळे कुटुंबच व्यवसायात मग्न असतो. लग्नकार्याकडे निव्वळ व्यवसाय म्हणून बघत नाही, तर आपल्या हातून रोज अनेकांचे हात पिवळे होऊन एक नवा संसार थाटला जातो, याचेच समाधान आम्हा कुटुंबीयांना आहे. 

मूळची मी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीची. शिक्षण एमएपर्यंत झालेले. लग्नाआधी माहेरी पतसंस्थेत काम करीत. वडिलांचे एसटी स्थानकात कॅंटीन असल्याने मला अनुभव होता. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या संजीवन समाधीने पावन झालेल्या आळंदीत माझा विवाह झाला. लग्नानंतर पती जनकशेठ जोशी यांना हातभार लावावा म्हणून मी घरगुती पद्धतीचे जेवण देणारी खानावळ जोशी भोजनालय नावाने सन २००० मध्ये सुरू केली.

अल्पावधीत लोकांच्या पसंतीस खानावळ उतरल्याने व्यवसाय चांगला चालला. आजही लोक भोजनालय शोधत येतात. इच्छा होती, की पैशांपेक्षा समोरच्याची तृप्ती महत्त्वाची, हा उद्देश ठेवूनच जेवण बनविले जात. रात्री उशिरापर्यंत आलेल्या लोकांना, शालेय विद्यार्थ्यांना जेवण दिले. वेळेचे बंधन कधी पाळले नाही. दारात आलेली व्यक्ती उपाशी राहू नये, हीच त्यामागची भावना होती. आळंदीत अनेक वर्षांपासून लग्नांचे सोहळे मोठ्या स्वरूपात पार पडतात. यामुळे अनेकांना रोजगार मिळण्यास मदत होते. आपणही लग्ने लावू, असे पतीला सुचविले. तत्काळ त्यांनी होकार दिला आणि तेथून पुढे छोटी लग्ने लावण्यास सुरवात केली. तसे तर ही एक रिस्क होती.

लग्नाबाबत कल्पना नव्हती. तरीही मोठी उडी घ्यायचे आम्ही पती-पत्नींनी ठरविले. स्वतःची जागा नसल्याने छोट्या-छोट्या धर्मशाळा भाड्याने घेऊन लग्न लावू लागले. लग्नामध्ये जेवणाचे काम मिळत गेल्याने आर्थिक कमाईही चांगली होऊ लागली. आता आमच्या जोशी मंगल कार्यालयात मोठी लग्ने होतात. पाचशेपेक्षा अधिक वऱ्हाडींची एकाच वेळी पाच ते सहा विवाह सामरंभ आम्ही एका दिवसात सहज करतो. लग्नकार्ये करणे एकट्या-दुकट्याचे काम नाही. लग्न म्हणजे प्रचंड धावपळ. घोडा, बॅण्ड, केटरिंग, हॉलची व्यवस्था. अशा अनेक सोयी आम्हाला एकाच वेळी कराव्या लागतात.

यासाठी मनुष्यबळही खूप लागते. कार्यालयात काम करणारे लोक सुरवातीला कधीच एका जागेवर काम करीत नसत. जिकडे जादा पैसे मिळत तिकडे कामगार जात होते. ऐनवेळी कामगार मिळेनासे झाले. मग कामगारांसाठी सकाळीचा नाष्टा, जेवण, तसेच त्यांच्या कुटुंबाकडे आम्ही तेवढ्याच मायेने बघतो. आता कामगारांची चिंता मिटली. माझ्या दोन्ही व्यवसायात मला माझ्या पतीबरोबर मुले, बहीण,आई-वडील सर्वांची मोलाची मदत होते. अख्खा दिवस आमचा कामात व्यग्र असतो.

घरातील प्रत्येक व्यक्ती स्वावलंबी आहे. आळंदी आणि पंचक्रोशीत सांस्कृतिक अथवा महिलांशी निगडित कार्यक्रम असला, की वेळावेळ काढून हजेरी लावते. 

सर्वांशी प्रेमाने वागून संबंध टिकवून ठेवायचे, हा आमच्या कुटुंबीयांचा स्वभाव. सासू-सासऱ्यांची पुण्याई आणि सासू मायाळू असल्याने तोच स्वभाव पती जनकशेठ यांचा. मदतीसाठी आम्ही तत्काळ हजर असतो. सुख-दुःखात सामील होत असल्याने आमच्या जोशी कुटुंबाचा लोकांशी संपर्क सुरवातीपासूनच दांडगा. लोकांप्रति काम करण्यासाठी अथवा मदतीचा हात देण्यासाठी तुम्हाला राजकीय पद अथवा सामाजिक ओळख असलीच पाहिजे, असे काही नाही. तर, तुमच्या अंगात मुळात दातृत्व भाव हवा. मदतीसाठी कोणी आले की आम्ही नाही म्हणत नाही. दिल्याने वाढते, हा माझ्या पतीचा स्वभाव. व्यवसायामुळे मी आणि माझे पती समाजातील विविध गोरगरिबांची लग्ने आम्ही कमी किमतीत लावून देतो. रोजगाराची जिथे खात्री नव्हती. तिथे मंगलकार्यालयामुळे नवे क्षेत्र मिळाले. समाजात दुःखे सर्वांनाच आहे. मात्र, दुःख कवटाळत न बसता त्यावर मात करायची आणि पुढे जायचे. कष्टाने पुढे जाता येते. प्रपंच करता येतो. हे आमच्या जगण्याचे सूत्र. त्यातच स्वामींवर आमची श्रद्धा असल्याने त्यांचा प्रसाद आणि आशीर्वादाचे बळ असल्याने आमच्या कष्टाला यश आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inspirational story of Sonalbhabhi Joshi on the occasion of womens day