Ganesh Divekar : शेतकऱ्याच्या मुलाची फौजदारपदाला गवसणी; गणेश दिवेकर याचे लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश

आभाळ कवेत घेण्याची जिद्द, कठोर परिश्रम अन कर्तृत्वाची साथ असेल तर ध्येय साध्य झाल्याशिवाय राहत नाही.
Ganesh Divekar
Ganesh Divekarsakal
Updated on

वरवंड - आभाळ कवेत घेण्याची जिद्द, कठोर परिश्रम अन कर्तृत्वाची साथ असेल तर ध्येय साध्य झाल्याशिवाय राहत नाही. याच इच्छाशक्तीच्या जोरावर वरवंड (ता. दौंड) येथील शेतकरी कुटुंबातील गणेश अंकुश दिवेकर या विवाहीत तरुणाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत यश संपादन करून फौजदार पदावर नाव कोरले. कुटुंबाबरोबर गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या गणेशचा ग्रामस्थांच्या वतीने जंगी सन्मान करण्यात आला.

आनंदाश्रू अनावर झालेले वडील अंकुश व आई लक्ष्मी दिवेकर यांनी पेढा भरवून गणेशचे अभिनंदन केले. येथील जनाईमळा वस्तीवरील अंकुश व लक्ष्मी दिवेकर या दांपत्याचा गणेश मुलगा आहे. गणेशच्या मनात शालेय जीवनापासून पोलिस वर्दीविषयी कुतूहल होते. तसेच आई वडिलांनाही मुलगा पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न होते.

घरची परिस्थिती बेताची असताना त्यांनी गणेशला चांगले शिक्षण दिले. गणेशने वरवंड येथील ग्रामशिक्षण संस्थेचे श्री गोपीनाथ विद्यालयात इयत्ता बारावी पर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर त्याने माळेगाव-बारामती येथे व्यवस्थापन शास्त्र अभ्यासक्रमाची पदवी व पदविकाचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याने मनात असणाऱ्या फौजदार पदासाठी लक्ष केंद्रित केले.

या दरम्यान गणेशचे अंकिता हिच्याशी विवाह झाला. आई-वडिलांप्रमाणे पत्नीची साथ मिळाली. त्याने एमपीएससी परीक्षेच्या अभ्यासाकडे वाटचाल करीत रात्रंदिवस कठोर परीश्रम घेतले. २०१७-१८ तसेच २०१९-२० व २१ साली एमपीएससीच्या माध्यमातून फौजदारपदाची परीक्षा दिली.

मात्र, यशाने गुंगारा दिला. अपयशासमोर पराभूत न होता त्याने पुन्हा चिकाटी बांधली. जिवाचे रान करून व जिद्द उराशी बाळगून पुन्हा परीक्षेची जोरदार तयारी केली. अखेर २०२३ साली झालेल्या एमपीएससी परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला. अन गणेशची अखेर स्वप्नपूर्ती झाली. गणेशला २७८ गुण मिळाले.

निकाल जाहीर होताच आई-वडील व पत्नीचा आनंद गगनात मावत नव्हता. कुटुंबाबरोबर संपूर्ण गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या गणेशची गुलालाची उधळण करून गावातून जंगी मिरवणूक काढली. यावेळी ग्रामस्थांनी तसेच ग्राम शिक्षण संस्थेच्या वतीने गणेशचा सत्कार व अभिनंदन कार्यक्रम झाला.

मी शेतकरी कुटुंबात असून माझ्या यशामागे आई लक्ष्मी वडील अंकुश व पत्नी अंकिता याची भूमिका व साथ महत्त्वाची होती. अपयशाला घाबरून न जाता जिद्द, प्रयत्न कायम ठेवले तर यशाचे शिखर गाठणे शक्य आहे.

- गणेश दिवेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com