आतुरता गणरायाच्या आगमनाची 

BLW19A00136.jpeg
BLW19A00136.jpeg



पुणे ः गणपती बाप्पा आणि महालक्ष्मीच्या आगमनाला काहीच दिवस उरले असल्याने बाणेर, बालेवाडी येथील बाजारपेठा सजल्या असून सगळीकडेच उत्साह संचारला आहे. आपल्या बाप्पाची मूर्ती आरक्षित करण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू झाली आहे. अनेक सार्वजनिक मंडळांचे मंडप उभारणीसह सजावटीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. वर्गणी गोळा करण्यासह परवान्यांसाठी कार्यकर्त्यांची धावपळ सुरू आहे 

थर्माकोलवर बंदी असल्याने कापड, कागद, लाकूड यांचा वापर करून सजावट किंवा मखर बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तयार मखरांमध्ये कागदी पुठ्ठ्यांचा वापर केलेला आहे. विद्युतमाळा, विविध उपकरणांनी इलेक्‍ट्रिकची दुकाने सजली आहेत. 

या खरेदीबरोबरच आपल्या गौरी-गणपतीसाठी वेगळ्या प्रकारचे काही साहित्य मिळते का यासाठी ऑनलाइन खरेदीही सुरू आहे. कॉम्पुटरच्या युगात यू-ट्यूबवर गणपतीसाठी डेकोरेशन कसे करावे, हेही व्हिडिओ घराघरांतून पाहिले जात आहेत. महिलावर्गात घराच्या साफसफाईपासून फराळ बनविण्यासाठी लागणारे साहित्यही घरी आणले जात आहे. महालक्ष्मीसाठीचे मुखवटे, दागिने, साड्या घेण्यासाठी महिला खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. घरातील गणेशाची मूर्ती आरक्षित करण्यासाठी नागरिक दुकानात गर्दी करत आहेत. गणपतींच्या मूर्तीबरोबरच विक्रेत्यांनी महालक्ष्मीचे मुखवटेही विक्रीस आणले आहेत. 

अनेक सार्वजनिक गणेश मंडळाचे मंडप तयार असून, देखाव्याचे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे. देखाव्यासाठी लागणाऱ्या मूर्त्या मंडपात हजर असून, गणपती बाप्पाच्या मूर्तीची रंगरंगोटी पूर्ण झाली आहे. लहान मुले हातात पावती पुस्तक घेऊन घरोघरी, दुकानातून वर्गणी गोळा करताना दिसत आहेत. अनेक सोसायट्यांमधून गणेशोत्सवानिमित्त संस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात, त्याचा सरावही सुरू झाला आहे. ढोल-ताशा पथकाच्या सरावाने परिसरात दुमदुमू लागला आहे. एकंदरीतच बाप्पाच्या आगमनाची सर्वच जण मोठ्या आतुरतेने वाट पाहत असल्याने वातावरण गणेशमय झाले आहे. 

व्यावसायिकांच्या प्रतिक्रिया 
 

निखिल मुरकुटे, शिवशक्ती गणपती विक्री केंद्र, बाणेर ः या वर्षी नागरिकांकडून पर्यावरणपूरक शाडूच्या माती आणि कागदी लगद्यापासून तयार केलेल्या मूर्तींना चांगली मागणी आहे. या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे गणपती बनवणाऱ्या कारागिरांनाही फटका बसला आहे. पावसामुळे मूर्ती न वाळल्याने मागणी असूनही पुरवठा मात्र कमी आहे. 

लुमिनो इलेक्‍ट्रॉनिक : सध्या गणेशोत्सवासाठी बाजारात अनेक नवीन डिझाइनच्या आकर्षक लाइटच्या माळा उपलब्ध आहेत. ग्राहक भारतीय बनावटीच्या माळा मागतात, पण प्रत्यक्षात मात्र चायनाकडून आलेल्या वस्तू खरेदी करण्याकडेच नागरिकांचा कल आहे. भारतीय बनावटीपेक्षा चायनाच्या वस्तू नागरिकांच्या पसंतीस उतरत आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com