मावळातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
वडगाव मावळ, ता. ८ : जागतिक महिला दिनानिमित्त होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन, पुणे आणि गेस्टॅम्प ऑटोमोटिव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, टाकवे यांच्या संयुक्त विद्यमाने मावळ तालुक्यातील सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.
जांभूळ फाटा येथील शिवराज पॅलेसमध्ये रविवारी या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना, दीपप्रज्वलन, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. प्रमुख पाहुणे कंपनीचे सीईओ ग्लेन जोन्स, फाउंडेशनचे संस्थापक डॉ. कॅरोलिन डी वोल्टर, उमेद अभियानाचे समन्वयक सुभाष गायकवाड, माजी शिक्षण विस्तार अधिकारी शोभा वहिले, सविता भोरे आदी उपस्थित होते.
डॉ. कॅरोलिन डी वोल्टर व ग्लेन जोन्स यांनी महिलांचे समाजातील योगदान अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, महिलांनी शिक्षण, उद्योग, प्रशासन आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून समाजाच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. महिलांची सुरक्षा, आरोग्य आणि सक्षमीकरण ही आजच्या काळाची गरज असून त्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता आहे.
होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन आणि गेस्टॅम्प ऑटोमोटिव्ह इंडिया कंपनी यांच्या वतीने मागील पाच वर्षांपासून ग्रामीण भागात विविध सामाजिक प्रकल्प राबविण्यात येत आहेत. विशेषतः बालस्नेही पंचायत उपक्रमांतर्गत महिला व बालकांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण काम केले जात आहे. या उपक्रमांतर्गत विविध गावांमधील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. आंदर मावळातील आशा सेविका, अंगणवाडी सेविका, शिक्षिका, बचत गटातील महिला, ग्रामपंचायत अधिकारी तसेच महिला सरपंच अशा विविध क्षेत्रातील महिलांना वूमन अँड चाइल्ड फ्रेंडली चॅम्पियन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तत्पूर्वी महिलांच्या यशोगाथांचे व्हिडिओ सादरीकरण, आरोग्यविषयक माहिती, खेळ, झुम्बा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कंपनीचे अधिकारी शकील शेख यांनी केले प्रास्ताविक केले. वर्षा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. ऋषिकेश डिंबळे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

