पुण्यात आयआयटीएममध्ये आंतरराष्ट्रीय कार्यशाळा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

प्रा. इमॅन्युएल म्हणाले,"1971 च्या तुलनेत समुद्रकिनार पट्टीवर सध्या तिप्पट लोक राहतात. त्यामुळे चक्रीवादळाचे अंदाज लावणे किती आवश्‍यक आहे हे तेथील वाढत्या लोकसंख्येवरून अधोरेखीत होते.'' पुढील चार दिवसात जगभरातील विविध तज्ञ यासंबंधीत विषयांवर माहिती देणार आहेत. तसेच जागतिक स्तरावर विविध संस्थांमध्ये याचा वापर करण्यात येईल. 

पुणे :"मागील काही वर्षांमध्ये हवामानाचा अचूक अंदाज लावण्यात आम्हाला यश प्राप्त झाले आहे. सुधारीत कार्यप्रणाली आणि चांगल्या माहितीमुळे हे शक्‍य झाले. इतर देशांप्रमाणे भारत देश सुध्दा या क्षेत्रात सक्षमरित्या कार्य करु शकतो. या वर्षी मॉन्सून हंगामात पाच चक्रीवादळ निर्माण झाली होते. त्या सर्वांचे अंदाज या प्रणालीमुळे घेणे सोपे झाले होते,'' अशी माहिती केंद्र सरकारच्या पृथ्वी विज्ञान विभागाचे सचिव डॉ. एम. राजीवन यांनी दिली. 

भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेत (आयआयटीएम) आज अंतरराष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. अमेरिकेतील वातावरणीय विज्ञान संस्थेचे प्रा. केरी इमॅन्युएल, प्रा. ग्रॅम स्टिफन, आयआयटीएमचे संचालक आर. एस. नांजुनदिया आणि हवामान बदल संशोधन केंद्राचे कार्यकारी संचालक डॉ. आर. कृष्णन आदी उपस्थित होते. 

प्रा. इमॅन्युएल म्हणाले," 1971 च्या तुलनेत समुद्रकिनार पट्टीवर सध्या तिप्पट लोक राहतात. त्यामुळे चक्रीवादळाचे अंदाज लावणे किती आवश्‍यक आहे हे तेथील वाढत्या लोकसंख्येवरून अधोरेखीत होते.'' पुढील चार दिवसात जगभरातील विविध तज्ञ यासंबंधीत विषयांवर माहिती देणार आहेत. तसेच जागतिक स्तरावर विविध संस्थांमध्ये याचा वापर करण्यात येईल. 
 

हवामानाचा अंदाज लावण्यासाठी नव्या प्रणालीची गरज का? 
मागील काही वर्षांमध्ये अरबी समुद्रात अति तीव्र स्वरुपाच्या चक्रीवादळांची मालिकाच उभी राहीली होती. केरळमध्ये मॉन्सून हंगामात उष्णकटिबंधीय चक्रवात 'ओखी' हे अति तीव्र चक्रीवादळ आले होते. यामुळे मोठ्या प्रमाणात मालमत्ता आणि जीवितहानी झाली होती. तसेच ऑगस्ट 2018 मध्ये केरळमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे संपुर्ण राज्याला पुराचा तडाखा बसला. देशातील मुंबई, चेन्नई आदी महत्वाची शहरे समुद्रकिनारी आहेत. त्यामुळे अतिशय अचूक हवामान अंदाज वर्तविणाऱ्या प्रणालीची देशाला आवश्‍यकता आहे. तसेच कृषी प्रधान असलेल्या देशासाठी अचूक हवामान अंदाज नेहमीच महत्वाचा आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: International workshop at IITM