esakal | भारतीय भाषांमध्ये इंटरनेट वाढणार - डॉ. अजय डाटा
sakal

बोलून बातमी शोधा

भारतीय भाषांमध्ये इंटरनेट वाढणार -  डॉ. अजय डाटा

येत्या काळात भारतीय भाषांमध्येच इंटरनेटची वाढ झपाट्याने होईल. त्यामुळे प्रादेशिक भाषांमधील आशयाला सर्वाधिक मागणी राहणार आहे, असे ‘डाटा एक्‍सजेन’ या माहिती तंत्रज्ञान कंपनीचे संस्थापक-मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजय डाटा यांनी आज येथे सांगितले. 

भारतीय भाषांमध्ये इंटरनेट वाढणार - डॉ. अजय डाटा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - येत्या काळात भारतीय भाषांमध्येच इंटरनेटची वाढ झपाट्याने होईल. त्यामुळे प्रादेशिक भाषांमधील आशयाला सर्वाधिक मागणी राहणार आहे, असे ‘डाटा एक्‍सजेन’ या माहिती तंत्रज्ञान कंपनीचे संस्थापक-मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजय डाटा यांनी आज येथे सांगितले. 

सुमारे ८० टक्के भारतीयांना इंग्रजी येत नाही. त्यांना त्यांच्या भाषेमध्ये इंटरनेटवर माहिती हवी आहे. येत्या काळात भारतात इंटरनेटची जी वाढ होईल, ती या लोकांमध्ये होईल. त्यामुळे भारतीय भाषांमध्ये इंटरनेटवर आशय देण्याला सर्वाधिक महत्त्व राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की) या राष्ट्रीय संस्थेने भारतीय भाषांमधील इंटरनेट वाढीसाठी इंडियन लॅंग्वेज अलायन्स (फिक्की-आयएलआयए) स्थापन केला आहे. या संस्थेने पहिली मराठी परिषद पुण्यात घेतली. परिषेदत डॉ. डाटा बोलत होते. भारतात इंटरनेटवर प्रादेशिक भाषांचा होत असलेला प्रसार आणि प्रादेशिक भाषांपुढील आव्हाने या परिषदेचा उद्देश होता. आपल्या देशात २२ हून अधिक भाषा बोलल्या जातात, यातील १५ भाषांमध्ये आता डॉट भारत हे डोमेन उपलब्ध आहे. इंग्रजीतूनच डोमेन नोंदविण्याचे बंधन त्यामुळे संपले आहे, असेही डॉ. डाटा यांनी सांगितले. 

परिषदेतील सत्रांमध्ये ‘सी-डॅक’चे वरिष्ठ संचालक एम. डी. कुलकर्णी, बिट्‌स प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक संदीप नुलकर, राज्य मराठी विकास संस्थेचे प्रमुख आनंद काटीकर, फिक्की-आयएलआयएच्या प्रमुख सारिका गुलयानी यांची भाषणे झाली. भारतीय भाषांसमोरील आव्हाने या विषयावरील परिसंवादात डॉ. डाटा यांच्यासह ‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस, प्रथम बुक्‍सच्या ज्येष्ठ संपादक संध्या टाकसाळे, लिंग्वासोल कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी राजीवलोचन फडके, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे विश्वास सरमुकादम, डेक्कन कॉलेजच्या प्रा. सोनल कुलकर्णी-जोशी, ‘सारथी’ या वेबसाइटचे चीफ ग्रोथ ऑफिसर संग्राम सबत आणि अनुवादकार ललिता मराठे यांनी भाग घेतला.

loading image
go to top