S. L. Bhyrappa : सर्जनशक्ती, कल्पकतेतूनच घडतो लेखक;डॉ. एस. एल. भैरप्पा; ‘पाच दशकांचा लेखन प्रवास’वर मुलाखत

‘‘प्रवास, अभ्यास आणि संशोधनातून वास्तव मांडता येत असले तरी त्याचा एकूण लिखाणातील वाटा केवळ दहा टक्के असतो. ९० टक्के लिखाण हे लेखकाच्या सर्जनशक्ती आणि कल्पकतेतून आकारास येते. लेखकामध्ये हे दोन्ही गुण जन्मतःच असावे लागतात,’’
S. L. Bhyrappa
S. L. Bhyrappa sakal

पुणे : ‘‘प्रवास, अभ्यास आणि संशोधनातून वास्तव मांडता येत असले तरी त्याचा एकूण लिखाणातील वाटा केवळ दहा टक्के असतो. ९० टक्के लिखाण हे लेखकाच्या सर्जनशक्ती आणि कल्पकतेतून आकारास येते. लेखकामध्ये हे दोन्ही गुण जन्मतःच असावे लागतात,’’ असे मत ज्येष्ठ साहित्यिक एस. एल. भैरप्पा यांनी बुधवारी येथे व्यक्त केले. ‘‘साहित्याच्या अभ्यासातून प्राध्यापक होणे शक्य आहे, मात्र लेखक होण्यासाठी कल्पकताच आवश्यक असते,’’ असे त्यांनी नमूद केले.

राष्ट्रीय पुस्तक न्यास, पुणे पुस्तक महोत्सव आणि समर्थ युवा फाउंडेशनतर्फे आयोजित ‘पाच दशकांचा लेखन प्रवास’ या मुलाखतीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. श्रेष्ठ भारतीय साहित्यिकांच्या मांदियाळीत अग्रक्रमावर असलेल्या ९४ वर्षीय भैरप्पा यांना ऐकण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली होती. ज्येष्ठ अनुवादक उमा कुलकर्णी यांनी त्यांच्याशी संवाद साधला.या वेळी व्यासपीठावर भैरप्पा यांच्या साहित्याच्या अभ्यासक डॉ. उमा रामराव, लेखिका सहना विजयकुमार, साहित्य अकादमीचे सदस्य डॉ. नरेंद्र पाठक, पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे आदी उपस्थित होते.

भैरप्पा म्हणाले, ‘‘कन्नड साहित्य क्षेत्रातील समीक्षकांवर इंग्रजी साहित्याचा पगडा असल्याने सुरुवातीच्या काळात त्यांनी माझ्यावर टीका केली. मात्र मी भारतीय आहे आणि माझे विचार भारतीय आहे, या भूमिकेतून सातत्याने लिहीत राहिलो. मी तत्त्वज्ञानाचा विद्यार्थी होतो, काही काळ तत्त्वज्ञान शिकवले देखील होते. पण साहित्य हा माझा प्रांत आहे, हे लक्षात आल्यावर त्याकडे वळलो. पण ज्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला, त्याचे प्रतिबिंब माझ्या साहित्यात उमटले आहे. म्हणूनच माझे लिखाण आशयगर्भ आहे. साहित्यातून जीवन मूल्यांचा शोध घेतला आहे. समीक्षकांनी टीका केली तरी वाचकांनी मात्र नेहमीच बळ दिले.’’ आपल्या आवडत्या कलाकृतींविषयी विचारले असता ‘माझे सर्वाधिक आशयसंपन्न पुस्तक ‘पर्व’ आणि उत्कृष्ट कलाकृती म्हणजे ‘मंद्र’ आहे’, असे उत्तर त्यांनी दिले.

भारतातील मंदिरांवरील आक्रमणांविषयी बोलताना त्यांनी मुस्लिम धर्मावर टीका केली. ‘‘मुस्लिम धर्मात मूर्तिपूजा निषिद्ध असल्याने मुस्लिम आक्रमकांनी मंदिरे उद्‍ध्वस्त केली. अन्य धर्मीयांचे धर्मांतर करण्याची शिकवण त्या धर्मात आहे. जोवर मुस्लिमधर्मीय आपल्या या मूलभूत धार्मिक संकल्पनांमध्ये सुधारणा करत नाहीत, तोवर धर्मनिरपेक्षता प्रत्यक्षात येणार नाही,’’

असे भैरप्पा म्हणाले.

आयटी क्षेत्रातील नोकरी सोडून लिखाणाकडे वळलेल्या सहना विजयकुमार यांनी या वेळी भैरप्पा यांच्या मार्गदर्शनामुळे बहरलेला लेखनप्रवास उलगडला. डॉ. उमा रामराव यांनी भैरप्पा यांचे लिखाणामागील कष्ट, प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करण्याची वृत्ती आदींचे किस्से कथन केले. राजेश पांडे यांनी प्रास्ताविक केले. मिलिंद कुलकर्णी यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. डॉ. संजय चाकणे यांनी सूत्रसंचालन केले. प्रसेनजीत फडणवीस यांनी आभार मानले.

सीमावाद केवळ निवडणुकीपुरता’

‘‘भैरप्पा हे मराठी लेखक असून कन्नड भाषेत लिहितात, असे गमतीने म्हटले जाते. कारण मराठी वाचकांनी माझ्यावर भरभरून प्रेम केले. कर्नाटक आणि महाराष्ट्र हे दोन्ही प्रदेश सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न असून येथील लोकांमध्ये जिव्हाळ्याचे संबंध आहेत,’’ असे सांगत ‘सीमावाद केवळ निवडणुकीपुरता राजकारण्यांकडून तापवला जातो,’ अशी टीका एस. एल. भैरप्पा यांनी केली.

‘स्त्री-पुरुष भेद कला क्षेत्रात नाही’

‘‘कला आणि ज्ञानक्षेत्रात स्त्री किंवा पुरुष, असा फरक नसतो. लेखकाने लिहिताना स्वतःला स्त्री किंवा पुरुष म्हणून चौकटीत बंदिस्त करू नये आणि व्यक्तिरेखांचा देखील स्त्री किंवा पुरुष असा स्वतंत्र विचार करू नये,’’ असा सल्ला एस. एल. भैरप्पा यांनी दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com