‘राष्ट्रवादी’च्या मैदानात थेट पाच आयपीएस!

मंगेश कोळपकर - सकाळ वृत्तसेवा
Saturday, 17 October 2020

पुण्यालगतच्या पाचही जिल्ह्यांत थेट भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) अधिकाऱ्यांची पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. पाचही जिल्ह्यांना थेट ‘आयपीएस’ मिळण्याची ही पहिलीच वेळ असून ते सर्वजण युवा आहेत. 

पुणे - राजकीयदृष्ट्या आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या कोल्हापूर परिक्षेत्रात म्हणजेच पुण्यालगतच्या पाचही जिल्ह्यांत थेट भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) अधिकाऱ्यांची पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. पाचही जिल्ह्यांना थेट ‘आयपीएस’ मिळण्याची ही पहिलीच वेळ असून ते सर्वजण युवा आहेत. 

पुणे जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकपदी अभिनव देशमुख, कोल्हापूरच्या अधीक्षकपदी शैलेश बलकवडे, सांगलीच्या अधीक्षकपदी दीक्षितकुमार गेडाम, साताऱ्याच्या अधीक्षकपदी अजयकुमार बन्सल तर, सोलापूर ग्रामीणच्या अधीक्षकपदी तेजस्वी सातपुते यांची नियुक्ती झाली आहे. पाचही अधीक्षकांनी सूत्रे स्वीकारली असून कामकाजाला सुरवात केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे जिल्ह्याच्या अधीक्षकपदी यापूर्वी राज्य पोलिस  सेवेतील अधिकाऱ्यांनाही संधी मिळाली. परंतु, गेल्या १५ वर्षांत  थेट ‘आयपीएस’ अधिकारीच पुण्याच्या एसपीपदी आले आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर ग्रामीणमध्येही यापूर्वी थेट आयपीएस अधीक्षक होते. परंतु, पाचही जिल्ह्यांत एकावेळी पाच ‘आयपीएस’ असण्याची ही पहिलीच वेळ आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

देशमुख हे कोल्हापूरवरून पुण्यात आले तर, बलकवडे गडचिरोलीहून कोल्हापूरला पोचले. गेडाम रत्नागिरीवरून सांगलीत तर, बन्सल गडचिरोलीत अतिरिक्त पोलिस अधीक्षक होते. त्यांना बढती मिळाली आहे. सातपुते या साताऱ्यातून सोलापूर ग्रामीणमध्ये गेल्या आहेत. तर, पुण्याचे एसपी संदीप पाटील आता गडचिरोलीमध्ये उपमहानिरीक्षकपदावर बढतीवर पोचले आहेत. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गडचिरोली परिक्षेत्रात कार्यकाळ पूर्ण केल्यावर संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या पसंतीनुसार नियुक्ती देण्याचा पोलिस खात्यात अलिखित संकेत आहे. त्याची अंमलबजावणी याही वेळेला झाली आहे. त्यामुळे बलकवडे आणि बन्सल अनुक्रमे कोल्हापूर आणि साताऱ्यात आले आहेत. 

येत्या दोन वर्षांत 
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. या कालावधीत पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांत कायदा-सुव्यवस्था चांगल्या पद्धतीने राहण्यासाठी तरुण, तडफदार अधिकारी असावेत, असा राष्ट्रवादी काँग्रेसचा आग्रह होता. 

सलग तीन ‘क्रीम पोस्टिंग’चा विक्रम 
राज्यातील पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्या कायम पसंतीमध्ये असलेल्या  पुणे, कोल्हापूर आणि सातारा यापैकी एका जिल्ह्यात तरी पोलिस अधीक्षक म्हणून एकदा तरी जबाबदारी मिळावी, अशी अनेक पोलिस अधिकाऱ्यांची  इच्छा असते. पण, या तिन्ही जिल्ह्यांत एसपी म्हणून नियुक्ती मिळण्याचा चमत्कार यापूर्वी फक्त एकदाच झाला होता आणि आता त्याची पुनरुक्ती अभिनव देशमुख यांच्याबाबत झाली.  यापूर्वी डॉ. माधव सानप यांना तिन्ही जिल्ह्यांत अधीक्षकपदाची संधी मिळाली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IPS officers have been appointed as Superintendents of Police in five districts near Pune