

सात तेलवाहू जहाजांचे नुकसान
इराणचा दावा; अमेरिका-इस्राईलच्या हल्ल्यांची पुन्हा भीती
दुबई, ता. २२ (एपी) : होर्मुझच्या सामुद्रधुनीत सात तेलवाहू जहाजांना आग लागली किंवा त्यांचे नुकसान झाल्याचा दावा इराणने गुरुवारी केला. या जहाजांची हानी इराणच्या हल्ल्यांत किंवा सागरी सुरुंगांमुळे
झाल्याचे सांगितले जात आहे. एकाच रात्री सात जहाजांचे नुकसान झाल्याने पुन्हा युद्ध भडकण्याची भीती वाढली आहे.
इस्राईलमध्ये काही दिवसांत होणाऱ्या निवडणुकीत पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची सत्ता जाऊ शकते. तसेच, पुढील महिन्यात अमेरिकेत मध्यावधी निवडणुका होणार आहेत. युद्धामुळे वाढलेल्या महागाईवरून मतदारांमध्ये नाराजी असल्याने अमेरिका आणि इस्राईलकडून इराणवर पुन्हा हल्ले होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. इराणच्या सरकारी दूरचित्रवाणीने रिव्होल्युशनरी गार्डच्या नौदलाच्या हवाल्याने जहाजांवरील ताज्या हल्ल्यांची माहिती दिली. अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून व्यापारी जहाजांना मार्गदर्शन करणे सुरू ठेवल्यास या प्रांतातील अमेरिकी लष्करी तळांवर हल्ले करण्याचा इशाराही इराणने पुन्हा दिला. या घटनांमध्ये जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. ब्रिटनच्या ‘युनायटेड किंग्डम मेरिटाइम ट्रेड ऑपरेशन्स’ या सागरी सुरक्षा निरीक्षण संस्थेने या हल्ल्यांची नोंद केलेली नाही. मात्र, अलिकडच्या काळात काही जहाज कंपन्या अशा घटनांची माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याचे निरीक्षकांनी नमूद केले आहे.
चर्चेचे प्रयत्न सुरू
अमेरिका आणि इराण यांच्यात औपचारिक चर्चा पुन्हा सुरू व्हावी, यासाठी मध्यस्थ प्रयत्न करत आहेत. इराणने युद्ध संपवून एका आठवड्यात होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याचा प्रस्ताव पुन्हा मांडला. मात्र, त्यासाठी अमेरिकेने इराणच्या बंदरांवरील नाकेबंदी संपविण्यासह अनेक अटींची पूर्तता करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. जूनमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या करारातील अटींशी या मागण्या मिळत्याजुळत्या आहेत. तो करार झाल्यानंतर काही दिवसांतच कोलमडला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा सात दिवसांचा नवा प्रस्ताव फेटाळला. मात्र, दोन्ही देशांनी अप्रत्यक्ष चर्चा सुरू असल्याचे मान्य केले आहे. हा प्रस्ताव फेटाळल्यानंतर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवरील हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. पुन्हा व्यापक युद्ध सुरू झाल्यास या प्रांतातील नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल. तसेच, कच्चे तेल, नैसर्गिक वायू आणि खतांसारख्या उत्पादनांच्या जागतिक पुरवठ्यात अडथळे निर्माण होऊन त्यांच्या किमती पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.