शेवटच्या गोळीपर्यंत लढणार ः खतीबजादेह इराणच्या उपपरराष्ट्रमंत्र्यांचा ‘रायसीना डायलॉग’मध्ये सहभाग
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता.६ ः ‘‘अमेरिका आणि इस्त्राईलकडून सुरू असलेल्या हल्ल्याच्या विरोधात देशाचे संरक्षण करण्यासाठी त्यांचा शौर्याने मुकाबला करण्याशिवाय आमच्यासमोर दुसरा पर्याय नाही. त्यामुळे शेवटची गोळी आणि सैनिक असेपर्यंत आम्ही लढणार,’’ असा निर्धार ठाम प्रतिपादन इराणचे उपपरराष्ट्रमंत्री सईद खतीबजादेह यांनी शुक्रवारी रायसीना डायलॉग’ परिषदेत सहभाग घेताना केला.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे इराणमधील नेतृत्व बदलाची भाषा करत आहेत. जी व्यक्ती स्वतःच्याच देशातील न्यूयॉर्क शहराचा महापौर निश्चित करु शकत नाही, ती इराणचे नेतृत्व कसे काय ठरवणार,’’ असा टोला मारत खतीबजादेह म्हणाले की, अमेरिकेचे धोरण हे वसाहतवादाचे आहे. आपल्या देशात ते लोकशाहीच्या गोष्टी करतात, तर दुसरीकडे इराणमधील लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार ते पाडू पाहत आहेत. इराण सध्या युद्धाच्या स्थितीतून जात आहे. इराणी नागरिकांवर अमेरिका आणि इस्राईलकडून हल्ले सुरू आहेत. अशावेळी आक्रमणकर्त्याचा ठामपणे विरोध करणे हे आमचे लक्ष्य आहे. एखाद्या देशाचा नेता अन्य देशातील मुख्य नेत्याची हत्या करत राहिला आणि ही सामान्य बाब बनली तर जगात सामान्य राजनैतिक संबंध ठेवणे कठीण होऊन जाईल.
अमेरिका जमिनीवर हल्ले करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबद्दल विचारले असता कोणत्याही वसाहतवादी मोहिमेचा सामना करण्यासाठी इराण सज्ज असल्याचे खतीबजादेह यांनी सांगितले. राजकीय व्यवस्था बदलण्याच्या प्रयत्नांना इराणचा पूर्ण विरोध राहील, असे सांगत ते म्हणाले की, इराणच्या कुर्द समुदायाला फुटीरतावादाच्या दृष्टिकोनातून पाहणे उचित ठरणार नाही. इराणची जी ओळख आहे, त्यात कुर्द हा महत्त्वाचा भाग आहे. बाहेरच्या काही संस्थांचा फुटीरतावादी समूहांना पाठिंबा आहे. इतिहास आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या संरक्षणासाठी इराण लढत आहे.
ज्या पद्धतीने इराणवर हल्ला करण्यात आला, त्यामुळे आंतरराष्ट्रीय कायदे धोक्यात आले आहेत. अमेरिका आणि इस्राईलचे हल्ले बंद झाल्यानंतर परिस्थिती सामान्य होईल असा आमचा विश्वास आहे.
सईद खतीबजादेह, उपपरराष्ट्रमंत्री, इराण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

