भारतात खरंच लोकशाही जिवंत आहे का? - डॉ. गणेश देवी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dr Ganesh Devi

दक्षिणायनतर्फे ‘लेखक का बोलतो?' विषयावर पुण्यात परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.

भारतात खरंच लोकशाही जिवंत आहे का? - डॉ. गणेश देवी

पुणे - देशात २५ जून १०७५ आणीबाणी लागू झाली. त्यानंतर तब्बल ४७ वर्षांनी याच तारखेला एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जर्मनीत जाऊन तेथील भारतियांसमोर भारतात आजही लोकशाही जिवंत असल्याचे ठामपणे सांगतात आणि दुसरीकडे याच दिवशी सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना कसलेही वॉरंट न देता, गुजरातमधील दहशतवादी विरोधी पथकाचे पोलिस घरी येऊन अटक करतात. शिवाय देशात गेल्या सात वर्षात ६३ पत्रकार, लेखक आणि विचारवंतांच्या हत्या झाल्या आहेत. या घटना पाहता, भारतात खरंच लोकशाही जिवंत आहे का, असा सवाल ज्येष्ठ साहित्यिक आणि भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी सोमवारी (ता.२७) येथे एका कार्यक्रमात बोलताना केला.

दक्षिणायनतर्फे ‘लेखक का बोलतो?' विषयावर पुण्यात परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके हे या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार, खासदार कुमार केतकर, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे आणि ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके आदी उपस्थित होते.

डॉ. देवी म्हणाले, ‘देशात अभिव्यक्ती सैनिकांची नावे कुठे दिली जात नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. समाजाला भ्रमामध्ये राहण्याचे वेड आहे, शौक आहे. यातून समाज निद्रिस्त झाला आहे. परंतु समाज निद्रिस्त असणे हा चिंतेचा विषय आहे. देशात सध्या निरागस लोकांना मृत्युदंडाची शिक्षा होऊ शकेल, असे वातावरण निर्माण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जर्मनीत जाऊन भारतात लोकशाही जिवंत असल्याचे सांगतात. त्याच दिवशी तिस्ता सेटलवाड यांना अटक होणे हा योगायोग आहे का?. या घटनेने भारतात यावर्षी २५ जूनला आणीबाणी लागली हे म्हणायचे धाडस समाज करीत नाही.’

केतकर म्हणाले, ‘‘समाज असंवेदनशील झाला आहे. समाजात अस्वस्थता शिल्लक राहिली नाही म्हणून साहित्य निर्मिती होत नसावी. पण अस्वस्थता का निर्माण होत नाही. कारण मध्यमवर्गीयांत स्वास्थ्य आहे. मध्यमवर्ग जाणीवपूर्वक स्वास्थ्याचा विचार करीत आहे. इतिहासाला विस्मृतीत घालण्याचा हा काळ आहे. अस्वस्थ समाजाकडे पाहायचे नाही, स्वातंत्र्य चळवळीला विसरायचे आहे, अशी मानसिकता तयार झाली आहे. इतिहासातून गांधी-नेहरू लुप्त होत आहेत. आणीबाणी काळानंतर खोटे नायक निर्माण केले जात आहेत.’ सत्य आणि नैतिकतेचा आग्रह धरणे हे लेखकाचे कर्तव्य आहे. सामान्य माणसाच्या मनात भीती, दहशत आहे. शिक्षणाच्या माध्यमातून इतिहासाशी नाळ तोडण्याचे, ध्येय-उद्दिष्टांपासून दूर नेण्याचे काम सुरू असल्याचे डॉ. नरके यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदेश भंडारे यांनी केले.

... म्हणून लेखकाला लिहावेसे वाटते - डहाके

स्पर्शातून आपल्या अस्तित्वाची जाणीव होत असते. पण हा स्पर्श हरवला आहे की काय, अशी सध्या परिस्थिती निर्माण झाली आहे. अशाही परिस्थितीत प्रत्यक्ष वास्तव आणि कल्पना यातून लेखक, कवी, शोध घेत आहेत, वेध घेत आहेत. उद्विग्न, खिन्न होत आहेत. अशाही परिस्थितीत सुन्न करणारी शांतता ऐकू येते म्हणून लेखक बोलतो, आतडे पिळवटते म्हणून त्याला बोलावेसे, लिहावेसे वाटते. भ्रमयुगात आपण प्रवेश केला आहे असे सासणे लिहितात. यामागे अबोध दहशत, आतंक आहे. हे भय आपण अनुभवत असतो पण मान्य करीत नाही, असे मत ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांनी व्यक्त केले.

Web Title: Is Democracy Really Alive In India Dr Ganesh Devi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :IndiapuneDemocracy
go to top