इस्रो सहल पूर्वचाचणी : जि. प. अहिल्यानगरचा स्तुत्य उपक्रम

इस्रो सहल पूर्वचाचणी : जि. प. अहिल्यानगरचा स्तुत्य उपक्रम
Published on: 

इस्रो सहल पूर्वचाचणीत ‘उर्दू’चाही सहभाग
विद्यार्थ्यांमध्ये ‘राज्यसेवे’चा उत्साह; संधी देण्याचा प्रयत्न
श्रीरामपूर, ता. ५ : भविष्यात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची सवय लागावी म्हणून शासनातर्फे विविध परीक्षांचे आयोजन केले जाते. मात्र, जिल्हा परिषदेने मागील काही वर्षांपासून अशा स्पर्धा परीक्षांमध्ये भर टाकत, विद्यार्थ्यांमध्ये प्रसिद्ध ‘इस्रो’ सहलीसारख्या परीक्षांचे आयोजन करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वेगळी संधी देण्याचा प्रयत्न केला.
अहिल्यानगर जिल्हा परिषदेने मागील चार वर्षांत कात टाकत स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून वेगळे काम करण्याचा प्रयत्न केला. त्यातील एक भाग म्हणजे ‘मिशन आरंभ’ या उपक्रमाच्या माध्यमातून वर्षभर उत्तम तयारी करून शिष्यवृत्तीसारख्या परीक्षांना अगदी सहजतेने सामोरे जाता यावे, असे वातावरण निर्माण करण्याचे काम मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आनंद भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी केले.
शहरातील डी. डी. काचोळे विद्यालयात नुकतीच ‘इस्रो सहल पूर्वचाचणी परीक्षा’ पार पडली. या परीक्षेत तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या मराठी व उर्दू माध्यमातील इयत्ता पाचवी ते सातवीतील ३१८ पैकी ३०९ विद्यार्थी उपस्थित होते. या परीक्षेचे विशेष म्हणजे विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही, जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून या स्पर्धांचे आणि इस्रो सहलीचे आयोजन केले जाते.
शासनाच्या राज्यसेवा परीक्षेच्या धर्तीवर आधारित या परीक्षेचे नियोजन असते. अगदी लहान वयात विद्यार्थ्यांना राज्यसेवा परीक्षा देण्याचा प्रत्यक्ष अनुभव जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दिला जातो. या परीक्षेचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांनाही यात प्रवेश देण्यात आला. त्यांच्यासाठी स्वतंत्रपणे उर्दू माध्यमातून प्रश्‍नपत्रिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या उपक्रमामुळे उर्दू माध्यमातील पालकांनीही जिल्हा परिषदेचे विशेष कौतुक केले. ‘मिशन आरंभ’ आणि ‘इस्रो’सारख्या परीक्षांमुळे भविष्यात चांगले अधिकारी होण्याची संधी मिळेल, असा आशावाद विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रियांमधून व्यक्त केला.
शिक्षण विस्तार अधिकारी राजमोहम्मद शेख यांनी भेट दिलेल्या या परीक्षा केंद्रातील परीक्षेचे नियोजन गटशिक्षणाधिकारी दीपक त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विस्तार अधिकारी सुनील दरंदले यांनी परीक्षा संचालक, तर केंद्रप्रमुख शीतल गायकवाड यांनी सहायक संचालक म्हणून पार पाडले. केंद्र प्रमुख शकील बागवान, विषय शिक्षक गणेश बाचकर आणि पर्यवेक्षकांनी परीक्षा कार्यात उत्तम सहकार्य केले.
-------------
उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांना अशा दुर्मिळ स्पर्धा परीक्षांची संधी दिल्यामुळे आणि शिक्षकांनी ही चांगली तयारी करून घेतल्याने नजीकच्या काळात उर्दू माध्यमातील शाळांमधील पटसंख्या नक्कीच वाढेल. शिवाय, विद्यार्थी भविष्यात चांगले अधिकारी होण्याचे स्वप्न पाहू शकतील.
-शहेनाज मेमन, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, हरिहरनगर उर्दू शाळा.
-----------
मला आज इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी म्हणून नव्हे, तर मोठा अधिकारी होण्यासाठी राज्य शासनाची मोठी परीक्षा देत आहे, असा भास झाला. या अनुभवामुळे मला मोठा अधिकारी होण्याची स्वप्ने पडू लागली आहेत.
-अनुष्का गडाख, विद्यार्थिनी, पीएमश्री शाळा, गोंडेगाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com