गावचे गावपण अन्‌ उद्याच्या अपेक्षा

गावचे गावपण अन्‌ उद्याच्या अपेक्षा

हिंजवडी, माण, मारुंजी, गहुंजे, नेरे, जांबे, सांगवडे आणि देहू या गावांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश करण्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. राज्य सरकारचे शिक्कामोर्तब ही फक्त औपचारिकता आहे. देहूसारखे तीर्थक्षेत्र आणि द्रुतगती महामार्गाच्या दुतर्फाची ही गावे असल्याने गावांचे भले होईल आणि शहराच्या वैभवातही भर पडेल. मूठभर राजकीय मंडळींचा विरोध असला, तरी विकासाची आस लागलेल्या नागरिकांना कधी एकदा शहरात येतो, असे झाले आहे. या गावांचे आजचे गावपण आणि जनतेच्या उद्याच्या अपेक्षा जाणून घेणारी ही मालिका आजपासून...

‘आयटी हब’मुळे जगाच्या नकाशावर आलेले हिंजवडी गाव. हिंजवडीत आयटी औद्योगिक क्षेत्र विस्तारले गेले, त्यास पुढील वर्षी तब्बल वीस वर्षे पूर्ण होतील. या वीस वर्षांत आयटी क्षेत्राचा वेगाने विकास झाला. शेकडोच्या संख्येने येथे कंपन्या आल्या. कर्मचारी संख्या चार लाखांच्या वर गेली.

पाठोपाठ गावाची बकालताही वाढली. अनधिकृत बांधकामांना पेव फुटले. रस्त्यांना अतिक्रमणांचा विळखा पडला. लोकसंख्येची दाटी वाढली.

परिणामी, ग्रामपंचायतीकडून पुरविली जाणारी सुविधा तोकडी पडू लागली. पाणीवाटप, कचरा व्यवस्थापन, रस्ते, मैलापाणी असे अनेक प्रश्‍न ‘आ’ वासून उभे राहिले. त्यामुळे गाव समाविष्ट करण्याचा प्रस्ताव समोर आल्यानंतर येथील सुशिक्षित व तरुण रहिवाशांमध्ये दबक्‍या आवाजात विकासाभिमुख चर्चा सुरू झाली; तर अनेक ग्रामस्थांनी विशेषत: राजकीय मंडळींनी गाव समाविष्ट करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे गावामध्ये आता दोन्ही बाजूंनी वारे वाहू लागले आहेत. ग्रामपंचायत गावाचा विकास करण्यास सक्षम असल्याचे काहींचे ठाम मत आहे; तर हा विकास सुनियोजनबद्ध पद्धतीने व्हायला हवा, असा काहींचा आग्रह आहे. 

२०११च्या जनगणनेनुसार ११,४६२ लोकसंख्या असून, तरंगती लोकसंख्या ४० ते ५० हजार आहे. ६ प्रभागांत विभागलेल्या या गावात मुकाईनगर, हमदान वस्ती, साखरे ढवळे वस्ती, साखरे हुलावळे वस्ती, भटेवरानगर, वाकड रोड, म्हातोबानगर, घरकुल वस्ती अशा वाड्यावस्त्या आहेत. 

गावाचे एकूण क्षेत्रफळ  ८३३.१० हेक्‍टर असून, त्यापैकी पाच हेक्‍टर गायरान आहे; तर एमआयडीसीमध्ये गेलेला भूभाग ८३ ते ४५ हेक्‍टर आहे. गावामध्ये शेती तुरळक असली, तरी बागायत ५० हेक्‍टर, जिरायत १५६ हेक्‍टर आहे. गावातील मुख्य पिक भात, कडधान्ये आहे. 

म्हातोबा देवस्थान ट्रस्ट हे गावातील सार्वजनिक ठिकाण. गाव हद्दीत ९७ कंपन्या असून, ११ मोठे बांधकाम प्रकल्प आहेत. हेच गावाच्या उत्पन्नाचे मुख्य साधन आहे. त्यातून ग्रामपंचायतीला १२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. त्यातून आतापर्यंत विविध सुविधा पुरविल्या गेल्या आहेत.

गावात प्राथमिक आरोग्य उपनकेंद्र असून, प्रत्येकी एक प्राथमिक व माध्यमिक शाळा आहे; तर १७ मंदिरे आहेत. तीन व्यायामशाळा आहेत. गावाचा पाण्याचा मुख्य स्रोत मुळा नदी, एमआयडीसी आणि गावातील विहिरी आहेत. 

ग्रामपंचायत सदस्य म्हणतात...
उमेश साखरे - हिंजवडी महापालिकेत जाण्यास अनेक ग्रामस्थांचा विरोध आहे. ग्रामस्थांनी घेतलेल्या भूमिकेचा आम्ही आदर करतो. आयटी हबमुळे गावाला वेगळी ओळख मिळाली आहे. महापालिकेतील समावेशामुळे ही ओळख पुसली जाण्याची भीती आहे. एमआयडीसीने ग्रामपंचायतीला विश्‍वासात न घेतल्याने गावाच्या विकासाला चालना मिळाली नाही.

महापालिकादेखील चुकीचे निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या जमिनी लाटतील, अशी ग्रामस्थांना भीती आहे. महापालिकेच्या समावेश होऊ नये, यासाठी आम्ही काहीही करण्यास तयार आहोत. प्रसंगी रस्त्यावर उतरू. 

सागर साखरे - महापालिकेत जाण्यास आमची कोणतीही हरकत नाही. मात्र, महापालिकेने सर्वप्रथम विकास आराखडा तयार केला पाहिजे; तसेच येथील सर्व बांधकाम नियमित केली पाहिजे; तसेच पाणी, ड्रेनेज, कचरा, अनधिकृत बांधकामे हे येथील मुख्य प्रश्‍न आहेत. ते सोडविण्यासाठी महापालिकेत जाणे गरजेचे आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com