

सकाळ एक्सक्ल्युझिव्ह
आयटी पार्कसाठी आणखी ५ हेक्टर जमीन
‘जलसंपदा’चे मोजणीसाठी ‘भूमिअभिलेख’ला पत्र; हस्तांतरणाचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ५ : होटगी तलावाजवळील ५० एकरात आयटी पार्क उभारले जाणार आहे. सध्या तलावाच्या सांडव्यामुळे १४.०५ हेक्टरच जमीन मिळणार आहे. परंतु, तलाव परिसरात आणखी सहा हेक्टर जमीन शिल्लक आहे. त्या क्षेत्राची नुकतीच उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन पवार, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी शिवाजी राठोड यांनी पाहणी केली. त्यानंतर जलसंपदा विभागाने त्या क्षेत्राच्या मोजणीचे पत्र भूमिअभिलेख कार्यालयास पाठविले आहे. मोजणीनंतर ती जमीनही आयटी पार्कसाठी हस्तांतरित केली जाणार आहे.
३ सप्टेंबर रोजी भूमिअभिलेख कार्यालयाकडून होटगी तलाव परिसरातील आयटी पार्कसाठी द्यायच्या क्षेत्राची हद्द कायम करण्यात आली. मोजणीअंती २० हेक्टरपैकी ५.९५ हेक्टर क्षेत्र होटगी तलावाच्या सांडव्यात असल्याने उर्वरित १४.०५ हेक्टर क्षेत्र आयटी पार्कसाठी देण्यास योग्य असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले. दरम्यान, ८ सप्टेंबर २००९ मधील तरतुदीनुसार तसेच महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाच्या बैठकीतील ठरावानुसार होटगी तलाव परिसरातील १५.०५ हेक्टर जमीन आयटी पार्कसाठी ‘एमआयडीसी’कडे हस्तांतरित करण्यासाठी प्रथमतः महसूल विभागाकडे समर्पित करणे आवश्यक आहे. त्यामुळे त्या क्षेत्राचे महसूल विभागाकडे हस्तांतरण करावे, असे आदेश उपजिल्हाधिकारी (महसूल) लक्ष्मण कसेकर यांनी दक्षिण सोलापूरच्या तहसीलदारांना दिले आहेत. त्या उताऱ्यावर ‘महसूल विभाग महाराष्ट्र शासन’ अशी नोंद करावी आणि तो दुरुस्त सातबारा उतारा कार्यालयास सादर करावा, असेही आदेशात नमूद आहे. आदेशानुसार तहसीलदार लवकरच कार्यवाही करतील, असे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी ‘सकाळ’ला सांगितले.
कोट :
आयटी पार्कसाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी येथील लघु पाटबंधारे विभागाची गट क्र. ५७६ मधील २० हेक्टर जागा कायमस्वरूपी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांना हस्तांतरित करावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. त्यानुसार आता ‘दक्षिण’च्या तहसीलदारांकडून कार्यवाही सुरू आहे. सातबारा उताऱ्यावर महसूल विभागाची नोंद लागल्यानंतर ती जमीन ‘एमआयडीसी’कडे हस्तांतरित करेल.
- शिवाजी राठोड, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.