'शैक्षणिक गुणवत्तेत आपण मागे'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

सकाळ शब्ददीप
‘सकाळ’च्या ‘शब्ददीप’ दिवाळी अंकात ‘थ्री इडियट’ या चित्रपटातील रांचो म्हणजे प्रत्यक्षातील सोनम वांगचूक यांच्या लेहमधील शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन केलेला ‘एका इडियट’ची शहाणी शाळा!’ हा रिपोर्ताज अवश्‍य वाचा.  

पुणे -‘‘देशात ९०३ विद्यापीठे आणि ३९ हजार ५० महाविद्यालये यांचे विस्तृत जाळे आहे; परंतु अद्यापही शैक्षणिक गुणवत्ता, जागतिक क्रमवारीत शैक्षणिक संस्था मागे असल्याचे वास्तव आहे,’’ अशी खंत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केली.

सिंबायोसिस अभिमत विद्यापीठाच्या पंधरावा पदवी प्रदान सोहळा कोविंद यांच्या प्रमुख उपस्थित लवळे  येथील कॅम्पसमध्ये मंगळवारी (ता.२३) झाला. या वेळी राष्ट्रपती यांच्या पत्नी सविता कोविंद, राज्यपाल सी. विद्यासागरराव, पालकमंत्री गिरीश बापट, शिक्षणमंत्री विनोद तावडे, संस्थेचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार उपस्थित होते. यावेळी ‘स्टुडंटस एज्युकेशनल अँड कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाख’चे संस्थापकीय संचालक सोनम वांगचुक यांना ‘डी. लिट’ प्रदान करण्यात आली. 

‘‘देशातील वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये, शिक्षण संस्थांमध्ये भेटीदरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधता येतो. त्यात विद्यार्थिनींची  शैक्षणिक कामगिरी ही विद्यार्थ्यांच्या तुलनेत अधिक चांगली असल्याचे  दिसून येते. शिक्षणाला लिंग,  भौगोलिक अशी कोणतीही सीमा नसते. शिक्षणामुळे जगभरातील  संधीची दारे उघडली जातात. शिक्षणातून जबाबदारीची जाणीव येते. सध्या देशात जवळपास १६६ देशांमधील ४६ हजार १४४ परदेशी विद्यार्थी विविध महाविद्यालये, विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेत आहेत. त्यामुळे शैक्षणिक संकुलांमध्ये बहुसांस्कृतिक वातावरणनिर्मिती होत आहे,’’ असेही कोविंद यांनी आपल्या भाषणात सांगितले.

या कार्यक्रमात पीएचडीधारक, सुवर्णपदक विजेते, वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या; तसेच पदवी, पदविकाधारक विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. युगांडामधून  कण्यासाठी आलेल्या वासवा हसन या विद्यार्थ्याला  सर्वोत्कृष्ट परदेशी विद्यार्थ्यांसाठीचा ‘डॉ. शां. ब. मुजुमदार पुरस्कार’  देण्यात आला. या वेळी डॉ. वांगचुक आणि विद्यापीठाच्या कुलगुरू  डॉ. रजनी गुप्ते यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मुजुमदार यांनी केले.

एखादा पुरस्कार मिळाला की अस्वस्थ व्हायला होते. मी माझे काम केले आहे, काहीही वेगळे केलेले नाही. माणसाला माणसुकीबद्दल एखादा पुरस्कार किंवा आदर मिळायला लागला तर ही आनंदाची, अभिमानाची बाब नाही, तर ती खेदाची बाब आहे. लडाखमधील परिस्थिती पाहून कामाला सुरवात केली. लडाखमधील विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सहभागातून नावीन्यपूर्ण कल्पना वापरून प्रयत्न सुरू केले. माणुसकी निभावण्यासाठी केलेल्या कामाला पुरस्कार मिळणे, हे मला उचित वाटत नाही.
- सोनम वांगचुक, संस्थापक संचालक, स्टुडंटस एज्युकेशनल अँड कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाख

Web Title: It is a reality that the global organization is behind educational institutions said President Ramnath Kovind