Vidhan Sabha 2019 : दोन दिवसांत उमेदवारीचा ‘निकाल’

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 September 2019

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुरवात झाली असली तरी, शहरात आघाडी आणि युतीच्या उमेदवारांची यादी अद्याप जाहीर झालेली नाही. दोन दिवसांत उमेदवार कोण असणार, याचा ‘निकाल’ लागणार असून, उमेदवारी अर्ज भरण्यास गती येणार आहे. 

विधानसभा 
पुणे - विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुरवात झाली असली तरी, शहरात आघाडी आणि युतीच्या उमेदवारांची यादी अद्याप जाहीर झालेली नाही. दोन दिवसांत उमेदवार कोण असणार, याचा ‘निकाल’ लागणार असून, उमेदवारी अर्ज भरण्यास गती येणार आहे. 

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता २१ सप्टेंबर रोजी जाहीर झाली. त्यानंतर पुण्यात भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी प्रचाराचा नारळ फोडला, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी कार्यकर्ता मेळावा घेऊन प्रचाराचा प्रारंभ केला. 

काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते पुण्यात आले नसले तरी, शहर पातळीवर मेळावे घेऊन निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले आहे. भाजप-शिवसेनेचे जागावाटपाचे घोडे अजूनही चर्चेतच अडले  आहे. 

दोन्ही पक्षांचे नेते महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार, अशी घोषणा करत आहेत; पण पुण्यात शिवसेनेला एक तरी जागा भाजप सोडणार का, हा कळीचा मुद्दा आहे. ऐनवेळी युती तुटली तर गडबड नको म्हणून शिवसैनिकही निवडणुकीच्या तयारीत आहेत.

पुण्यात भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार कोण असतील, यावरून राष्ट्रवादीचे उमेदवार निश्‍चित होतील, असे अजित पवार यांनी मेळाव्यात स्पष्ट केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसह काँग्रेसची यादी गुलदस्तात आहे. पण, ४ ऑक्‍टोबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्याने दोन-तीन दिवसांत चित्र स्पष्ट होण्याची शक्‍यता आहे. 

राष्ट्रवादीच्या सर्व इच्छुक उमेदवारांची तयारी पूर्ण झाली आहे. दोन दिवसांत पक्षाचे नेते उमेदवारी जाहीर करतील. सध्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर संघटनात्मक बैठकांवर भर दिला आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी सांगितले. दरम्यान, काँग्रेसची यादी जाहीर होण्याच्या प्रक्रियेत  आहे.

दिल्लीत आज रात्री होणाऱ्या बैठकीनंतर उमेदवारांच्या याद्या निश्‍चित होतील. त्यानंतर प्रत्येक उमेदवार संबंधित निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज भरेल.
- माधुरी मिसाळ, शहराध्यक्ष, भाजप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: It will understand who will be the candidate in two days for the Assembly elections