जैन गुरू परंपरा, पट्टाचार्यांच्या भूमिकेवर सोलापुरात मंथन

जैन गुरू परंपरा, पट्टाचार्यांच्या भूमिकेवर सोलापुरात मंथन
Published on

PNE26W45633
सोलापूर : राष्ट्रीय विद्वत संगोष्ठीत मंथन ऐकण्यासाठी उपस्थित जैन बांधव व अभ्यासक.
PNE26W45632
सोलापूर : मुनिश्री सुप्रभसागर महाराज यांच्या उपस्थितीत जैन गुरू परंपरा व पट्टाचार्यांच्या भूमिकेवर मंथन करताना अभ्यासक.

जैन गुरू परंपरा, पट्टाचार्यांच्या भूमिकेवर सोलापुरात मंथन
राष्ट्रीय विद्वत संगोष्ठीत देशभरातील तज्ज्ञांकडून आगम, आचार अन् परंपरेवर चर्चा

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २९ : जैन धर्मातील गुरू परंपरा आणि पट्टाचार्य पदाची जबाबदारी यांचा शास्त्राधारित उलगडा करण्यासाठी देशभरातील जैन तत्त्वज्ञानाचे विद्वान सोलापुरात दाखल झाले आहेत. श्री आदिनाथ महाराज दिगंबर जैन मंदिर ट्रस्टच्या श्री महावीर सांस्कृतिक भवनात शनिवार (ता. २९) व रविवार (ता. ३०) रोजी ‘परमपूज्य पट्टाचार्य श्री विशुद्धसागरजी गुरू परंपरा’ या विषयावर राष्ट्रीय विद्वत संगोष्ठी होत आहे.
सोलापुरात प्रथमच आयोजित या संगोष्ठीत जैन आगम, आचार, गुरू परंपरा आणि श्रावकाच्या आध्यात्मिक वाटचालीतील विविध टप्प्यांवर मंथन करण्यात येत आहे. श्रावकाने प्रतिमा धारण करण्यापासून २८ मूलगुणांचे पालन, प्रतिमाधारी होणे, क्षुल्लक दीक्षा स्वीकारणे, दिगंबर मुनी, आचार्य आणि पट्टाचार्य अशा विविध स्तरांपर्यंत जाण्याची जैन परंपरा आहे. या परंपरेचा कालागमाशी असलेला संबंध आणि प्रत्येक स्तराचे धार्मिक महत्त्व यावर विद्वान विचार मांडत आहेत.
----------------------
पट्टाचार्य पदाचे स्वरूप काय?
‘पट्ट’ आणि ‘आचार्य’ या दोन शब्दांपासून ‘पट्टाचार्य’ हा शब्द तयार झाला आहे. विशेष जबाबदारी स्वीकारणारा उत्तराधिकारी, अशी पट्टाचार्य पदाची संकल्पना आहे. आचार्य ज्ञान, आचरण व अनुशासनातून समाजाला मार्गदर्शन करतात, तर पट्टाचार्य जैन आगम, दर्शन व अध्यात्मपरंपरेचे मार्गदर्शन पुढे नेण्याची जबाबदारी सांभाळतात, याबाबत शनिवारी सविस्तर चर्चा झाली.
आचार्य शांतिसागर, आचार्य आदिसागर अंकलीकर, आचार्य महावीरकीर्ती, आचार्य विमलसागर, आचार्य सन्मतीसागर आणि गणाचार्य विरागसागर महाराज यांच्या गुरू परंपरेतून परमपूज्य १०८ सुप्रभसागरजी महाराजांचे गुरू परमपूज्य पट्टाचार्य विशुद्धसागर महाराज यांना पट्टाचार्य पद प्राप्त झाले.
----------------------
देशभरातील अभ्यासक सहभागी
डॉ. श्रेयांस जैन (वडौत), डॉ. सुनील जैन संचय (ललितपूर), डॉ. नरेंद्रकुमार (टीकमगड), पियुष जैन (विदिशा), ब्र. पंकज जैन (इंदूर), राजेंद्र सनावत, शैलेश जैन, डॉ. आशिष शास्त्री (दमोह), डॉ. ममता जैन (पुणे), पं. राजकुमार आळंदकर (सोलापूर), पं. अखिलेश, डॉ. ज्योती जैन खलवती (उत्तर प्रदेश) यांच्यासह देशातील विविध विद्यापीठांमधील प्राकृत व जैन तत्त्वज्ञानाचे अभ्यासक सहभागी झाले आहेत.
----------------------
गुरूच्या सानिध्यात वर्तन बदलते
परमपूज्य १०८ श्री सुप्रभसागर महाराज यांनी प्रवचनातून जिनवाणी, देव, शास्त्र आणि गुरू यांच्या महतीचे विवेचन केले. गुरू मानवाच्या कल्याणासाठी जन्म घेतात. गुरूच्या सानिध्यात श्रावकाच्या वर्तनात परिवर्तन होते आणि तो सन्मार्गाला लागू शकतो, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com